चिपळूण: कोकण विभागात सध्या पावसाळी ढगाळ वातावरण असून अवकाळी पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आंबा आणि काजू पिकांवर किड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा आणि काजू बागायतदारांनी आपल्या बागेची नियमित पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
आंबा पिकावरील किड आणि रोग:
फुलकिडी: प्रति मोहोर १० फुलकिडी किंवा फळांवर १ स्केल आढळल्यास थायोमेथॉक्झाम २५ टक्के २ ग्रॅम किंवा स्पिनोसॅड ४५ टक्के प्रवाही २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
करपा रोग: कार्बेन्डॅझीम १२ टक्के मॅन्कोझेब ६३ टक्के या संयुक्त बुरशीनाशकाची १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
फळमाशी: विद्यापीठाने विकसित केलेले रक्षक सापळे (मिथिल युजेनॉल ल्युअर्ससह) प्रति हेक्टर ४ या प्रमाणात बागेत लावावेत.
काजू पिकावरील किड:
काजूवरील ढेकण्या आणि बोंडू व बी पोखरणाऱ्या अळी: लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ६ मिली किंवा प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही १० मिली यापैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी.
फुलकिडी: ॲसिटामिप्रीड २० टक्के प्रवाही ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.बागायतदारांनी आपल्या बागेची नियमित पाहणी करावी.आवश्यकतेनुसार योग्य कीटकनाशकांचा वापर करावा.
वरील किटकनाशके लेबल क्लेम नसल्यामुळे कृषी तज्ञांचा सल्ला घ्यावा.अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने बागायतदारांनी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.