मुंबई – एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांत सुलभ परिवहन सेवेसाठी ई-बाइक टॅक्सीला राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी परवानगी दिल्यामुळे मुंबईत एकट्याने प्रवास करणाऱ्यांचा साधारण १०० रुपयांच्या प्रवास खर्च ३० ते ४० रुपयांपर्यंत येईल, असे परिवहन विभागाचे म्हणणे आहे.
तसेच १० हजार नवे रोजगार निर्माण होण्याची राज्य सरकारला अपेक्षा आहे.
एकटा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रिक्षा, टॅक्सीबरोबरच ई-बाइक टॅक्सीचा पर्याय देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या धोरणामध्ये योग्य त्या तरतुदींचा समावेश करण्यात येणार आहे. एकल प्रवास करणाऱ्यांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या या ई-बाइक टॅक्सीला पावसाळ्यात प्रवाशांची काळजी घेण्यासाठी बाईकला आवरण असणे आवश्यक ठरणार आहे. महिला प्रवास करत असताना, चालक व महिला प्रवासी यांच्यामध्ये बॅरिकेट बसवण्याची जबाबदारीही संबंधित चालकावर असेल, असे त्यांनी सांगितले.
रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मुलांसाठी १० हजारांचे अनुदान
धर्मवीर आनंद दिघे रिक्षा-टॅक्सी महामंडळाच्या सभासदांच्या मुलामुलींनादेखील ई-बाईक टॅक्सीचा व्यवसाय करता यावा, यासाठी या महामंडळाच्या माध्यमातून त्यांना दहा हजार रुपये अनुदान देण्याची योजनादेखील विचाराधीन आहे.
त्यामुळे भविष्यात त्यांना एक रुपयादेखील खर्च न करता ई-बाइकसाठी कर्ज उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहून नवीन व्यवसाय सुरू करणे शक्य होणार आहे.
“मुंबईत रस्त्यांवर आधीच वाहनांची गर्दी झाली आहे, पब्लिक ट्रान्सपोर्टची वेगवेगळी माध्यमे उपलब्ध आहेत. ई बाइक टॅक्सी मुंबई पुण्यासारख्या शहरात लागू गेल्यास रस्त्यावरील गर्दीत त्यांची आणखी भर पडेल. तसेच रस्त्यावरील वाहतूक शिस्त बिघडेल. त्यामुळे ई बाइक टॅक्सी टायर २ शहरात लागू करावी. त्याचबरोबर बाईक अपघात होण्याची तसेच अपघातात प्रवाशाला गंभीर इजा होण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी विमा धोरण काय असेल याची स्पष्टता असावी.“
– ए. व्ही. शेणॉय, वाहतूक तज्ज्ञ
ई-बाइक टॅक्सीमुळे प्रवास होणार स्वस्त; १० हजार नवे रोजगार, मुंबईतील प्रवास खर्चात ३० ते ४० टक्क्यांनी घट
