मुंबई:- महावितरणच्या वीज दर निश्चिती प्रस्तावावर देण्यात आलेल्या दर कपातीच्या आदेशाला महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानेच स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता नवा आदेश येईपर्यंत महावितरणच्या ग्राहकांना जुन्याच दराने वीज बिल भरावे लागणार आहे.
महावितरणने २०२५-२६ ते २०२९-३० या कालावधीसाठी दर निश्चिती याचिका दाखल केली होती. आयोगाने २८ मार्च रोजी त्यावर निर्णय घेत वीज दरात सरासरी १० टक्के कपात जाहीर केली. नवीन दर १ एप्रिलपासून लागू होणार होते. मात्र, महावितरणने या आदेशावर आक्षेप घेतला. आयोगाचे अध्यक्ष संजय कुमार, सदस्य सुरेंद्र बियाणी आणि आनंद लिमये यांच्या खंडपीठाने बुधवारी आपल्या जुन्या आदेशाला स्थगिती देत स्पष्ट केले की, सध्या नागरिकांना जुन्या दरानेच वीजबिल भरावे लागेल. महावितरण कंपनी एप्रिलच्या अखेरीस पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे.
“महावितरणने स्वतःच टप्प्याटप्प्याने वीज दर कमी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता; परंतु आयोगाने २८ मार्च रोजीच्या आदेशात वीज दरात भरमसाट कपात केली. आदेशामुळे महावितरणच्या आर्थिक स्थैर्याला धोका निर्माण होईल.“
– विश्वास पाठक,
स्वतंत्र संचालक, महावितरण
राज्यात वीज स्वस्त नाहीच, दरकपातीच्या आदेशाला आयोगाकडून स्थगिती
