मुंबई – मुंबईसह राज्यभरात मंगळवारी हवामानात झालेले बदल बुधवारीही कायम होते. त्यात आता पुढील चार ते पाच दिवस राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीचीही शक्यता आहे. तर मुंबईत मंगळवारच्या तुलनेत बुधवारी हवामानात बदल झाला, तापमान ३६ अंश नोंदविण्यात आले.
राज्यात दोन दिवसांपासून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस होत असला तरी कमाल तापमानाचा कहर कायम आहे. बुधवारी अहिल्यानगर ३७, बीड ३९.८, मालेगाव ३८.४, मुंबई ३६.९, नाशिक ३७.३, सोलापूर येथे ३८ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आज, गुरुवारी आकाश ढगाळ राहील. तसेच हलका पाऊस होईल, असा अंदाज आहे. अवकाळी पावसामुळे राज्यात पिकांचे नुकसान झाले आहे.
नाशिक जिल्ह्यात गारपीट
जिल्ह्यातील अनेक गावांत बुधवारी गारपीट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणची पिके आडवी झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्याला बुधवारी ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात गारा पडल्याने नुकसान झाले.
विदर्भाला वादळ, गारपिटीचा इशारा
पुढील २४ तासांत विदर्भातील काही भागांत साेसाट्याचे वादळ, विजांचा कडकडाट आणि गारपीटही हाेण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम बंगाल, हिमालय क्षेत्र ते मध्य प्रदेशपर्यंत तयार झालेले सायक्लाेनिक सर्क्युलेशन, बंगालच्या उपसागरातून येणारे आर्द्रतायुक्त पूर्वीय वारे आणि उत्तर भारतातून महाराष्ट्राकडे विरुद्ध दिशेने येणारे वारे यांचा संगम, तसेच महाराष्ट्र ते ओडिशापर्यंत तयार हाेणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले आहे.