खेड (प्रतिनिधी): गोव्यातील एका फसवणूक प्रकरणात बिहारमधून ताब्यात घेतलेला साक्षीदार गोव्याच्या पोलिसांना चकमा देऊन रेल्वेतून निसटल्याची खळबळजनक घटना मंगळवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास खेड येथील रेल्वे स्थानकात घडली. या घटनेमुळे गोव्याच्या पोलिसांची एकच धावपळ उडाली.
फसवणूक प्रकरणातील संशयितांच्या शोधासाठी गोवा पोलिसांनी कंबर कसली होती. या प्रकरणात सहभागी असलेल्या संशयितांबाबत बिहार येथील एका तरुणास माहिती असल्याची गोपनीय माहिती गोवा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गोवा पोलीस बिहार येथून एका साक्षीदारास ताब्यात घेत रेल्वेने गोव्याच्या दिशेने निघाले होते. ही रेल्वे खेड स्थानकात थांबली असता “जरा बाहेरून आलो” असे सांगत त्याने गोवा पोलिसांना चकवा दिला. साक्षीदार पसार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर गोवा पोलिसांनी स्थानक परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीच सुगावा न लागल्याने अखेर गोवा पोलिसांनी येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. रेल्वे स्थानक परिसरासह मोक्याच्या ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली. त्यानुसार खेड पोलिसांनी नाकाबंदी करत पसार साक्षीदाराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तो सापडला नाही. या प्रकाराने गोवा पोलिसांची झोप उडाली आहे.
गोव्यातील फसवणूक प्रकरणातील बिहार येथून आणलेला संशयित खेड रेल्वेस्थानकातून पसार
