पाली/वार्ताहर:-मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खानू गावच्या हद्दीतील महामार्ग लगतच्या एका घराच्या बाहेर असलेल्या तीन कुत्र्यांवर बिबट्याने मध्यरात्री दोन वाजण्याच्या दरम्यान येऊन हल्ला करून त्यातील ऐका कुत्र्याला ठार मारून घेऊन गेला तर दुसऱ्या दोन कुत्र्यांना जखमी केले आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे. महामार्गालगत भर वस्तीत बिबट्या ने थेट घरासमोरील भागात येऊन अशाप्रकारे केलेल्या हल्ल्यामुळे सध्या या परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्याच्या अस्तित्वामुळे भीतीचे वातावरण पाहावयास मिळत आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मुंबई गोवा महामार्गालगत खानू गावच्या हद्दीत सेवानिवृत्त शिक्षक संतोष आयरे यांचे घर असून त्या घराच्या बाहेरच्या बाजूला त्यांचे तीन कुत्रे रात्री बसलेले होते मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अचानक कुत्र्यांच्या भुंकण्याचा जोरजोरात आवाज येऊ लागल्याने तात्काळ श्री.आयरे यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता दोन कुत्रे जखमी अवस्थेत पडलेले होते तर एका कुत्र्याला बिबट्या घेऊन जात असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी प्रथमता जखमी कुत्र्यांना तात्काळ उपचार केले व घराच्या बाहेर असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना पाहिली असता त्यामध्ये बिबट्या येताना व हल्ला करून कुत्रा घेऊन जाताना स्पष्टपणे दिसत आहे.
खानू गाव हे दोन राष्ट्रीय महामार्गांवर वसलेले असून तेथे महामार्ग चौपदरीकरण करत असताना मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड झाल्याने शिवाय या परिसरातील जंगलही मोठ्या प्रमाणात मागील काही वर्षांमध्ये तोडले गेल्याने वन्यप्राणी सध्या भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळत असलेले पाहावयास मिळत आहे. खानु गावातील हा परिसर महामार्गालगत मुख्य मानवी वस्तीचा असल्याने अशाप्रकारे बिबट्याच्या वापराने येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून त्याचा ताबडतोब पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थातून केली जात आहे
रत्नागिरी : खानूमध्ये भरवस्तीत घुसून बिबट्याचा 3 कुत्र्यावर हल्ला, एकाला केले ठार, दोन जखमी
