संगमेश्वर:-माहे मार्च २०२५ मध्ये संगमेश्वर रेल्वे स्टेशन येथील वेटींग रुममधील महिलेंची बॅग चोरून नेवून त्यामधील सोन्या चांदीचे दागिने चोरल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुध्द दोन गुन्हे संगमेश्वर पोलीस ठाणेमध्ये दाखल झालेले होते. सदर दोन्ही गुन्हयाचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणणेबाबत संगमेश्वर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी शिवप्रसाद पारवे, परि. पोलीस उपअधीक्षक यांनी पोलीस ठाणे सर्व अधिकारी अंमलदार यांना मार्गदर्शन करून वेगवेगळी तपास पथक तयार केली व त्यांना योग्य सुचना दिलेल्या होत्या.
सदर तपास पथकामार्फत गुन्हयाचा तांत्रिकदृष्ट्या तपास करून गोपनीय माहिती मिळवून अज्ञात आरोपीचा शोध घेवून चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालु असताना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर रेल्वेमध्ये चोरी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार संतोष राणे हा चोरी करीत असल्याचे समजले. परंतु सदरचा आरोपी हा मोबाईल वापरत नसल्याने तसेच त्याचा कोणत्याही प्रकारचा तावठिकाणा नसल्याने त्याचा शोध घेणे संगमेश्वर पोलीसांसाठी एक मोठे आव्हान होते. म्हणून संगमेश्वर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने सलग सहा रात्री प्रवाशांचा वेश धारण करून संगमेश्वर रेल्वे स्टेशनच्या वेटींग रुममध्ये आरोपीला अटक करण्यासाठी सापळा रचला होता.
दिनांक ३०/०३/२०२५ रोजी संगमेश्वर रेल्वे स्टेशन येथे पुन्हा सापळा लावला असता रात्रौ ०१.०० वा. चे सुमारास संगमेश्वर वेटींग रुमचे बाहेरील बाजूस असलेल्या बाकड्यावर एक संशयीत इसम दिसून आला. त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने आपले नाव संतोष चंद्रकांत राणे, सध्या रा. आकुर्ली, कांदीवली, मुंबई, मुळ रा. मळगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदूर्ग असे सांगितल्याने त्याला ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने संगमेश्वर पोलीस ठाणे गु. रजि.नं. ३६/२०२५, भारतीय न्यास संहिता कलम ३०३ (२) व संगमेश्वर पोलीस ठाणे गु. रजि. नं. ५४/२०२५, भारतीय न्यास संहिता कलम ३०३ (२) या दोन्ही गुन्हयाची कबुली दिली असून गुन्हयातील चोरलेले ४४ ग्रॅम वजनाचे सोने व ७ ग्रॅम वजनाची चांदी असा एकूण रु. २,७०,०००/- किंमतीचा मुद्देमाल पनवेल, कल्याण, महाड येथून हस्तगत करून जप्त करण्यात आलेले आहे. गमूद चोरीच्या गुन्हयांमध्ये आरोपी याचा कोणताही पुरावा नसताना आरोपी याचा सर्वोतोपरी शोध घेवून गुन्हयात चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निलेश माईनकर, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. शिवप्रसाद पारवे, परि. पोलीस उपअधीक्षक, संगमेश्वर पोलीस ठाणे, यांचे आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक शंकर नागरगोजे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सी. टी. कांबळे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पी. एस. शिंदे, पोहेकॉ/१४३० एस. एन. कामेरकर, पोहेकॉ/१२७३ व्ही. व्ही. मनवल, पोहेकॉ/४६५ यु. एम. सासवे, पोकॉ/३९ एस. व्ही. आव्हाड, पोकॉ/१३९२ के. सी. घोलप, पोकॉ/१३५६ ए. पी. मस्कर, जी. डी. लोखंडे, पोकॉ/१३८६ आर. व्ही. पाईकराव यांनी केली आहे.
ब्रेकिंग: संगमेश्वर रेल्वे स्टेशनच्या वेटींग रुममधून प्रवाशांची दागिने चोरणाऱ्या अट्टल आरोपीला संगमेश्वर पोलीसांनी वेषांतर करून शिताफीने केली अटक
