राजापूर:- तालुक्यातील खरवते ग्रामपंचायतीने राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री शंभर दिवस कृती कार्यक्रमां’तर्गंत स्वत:चे संकेतस्थळ बनविणारी ग्रामपंचायत बनली आहे. तर राजापुरातील पहिली आणि जैविविधततेचे संकेतस्थळ विकसित करणारी दुसरी ग्रामपंचायत ठरली आहे. या संकेतस्थळाचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उद्घाटन झाले.माझी वसुंधरा अभियानांतर्गंत उपक्रम राबविणाऱ्या तालुक्यातील खरवते ग्रामपंचायतीने खरवते गावचे स्वत:चे संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेतस्थळावर खरवते गावची मुबलक निसर्गसंपदा, जैवविविधतता, धार्मिक आणि ऐतिहासिक वारसास्थळे, जलव्यवस्थापन, उद्योग व्यवसाय आदींसह खरवते गावच्या सर्वांगीण माहितीसह गावामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम यांचा समावेश आहे. गावातील शैक्षणिक सुविधा, विकासकामे, गावातील उल्लेखनीय व्यक्तींची माहिती, ऐतिहासिक वारसास्थळे, गावातील जलव्यवस्थापन, गावची जैवविविधता, माझी वसुंधरा अभियानाची माहिती आदींसंबंधित माहिती फोटोसहित या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. तसेच, देवराईच्या रूपाने नैसर्गिक जंगल कुठेकुठे आहे, कोणकोणती जैवविविधता आहे, कोणती ऐतिहासिक वारसास्थळे आहेत याबाबतच्या सविस्तर नोंदी आणि माहिती या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत. त्याचवेळी गावच्या विविधांगी माहितीसंबंधित व्हिडीओही प्रकाशित करण्यात आले आहेत.
संकेतस्थळाची निर्मिती करणारे श्री. तुळपुळे यांनी संकेतस्थळाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी गटविकास अधिकारी निलेश जगताप, खरवतेचे सरपंच अभय चौगुले, उपसरंपच गौरव सोरप, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी नेहा कुडाळी, शिवसेना तालुकाप्रमुख दिपक नागले, प्रकाश कुवळेकर, भरत लाड, प्रतिक मटकर, दयानंद चौगुले, भास्कर गुरसाळे, संकेतस्थळ विकसित करणारे हर्षद तुळपुळे, जेष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांच्यासह मोठ्यासंख्येने ग्रामस्थ, शिक्षकवृंद उपस्थित होते.
संकेतस्थळ बनविणारी खरवते राजापुरातील पहिली ग्रामपंचायत
