लांजा:- मठ येथील श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथाचा १०९वा चैत्रोत्सव येत्या सोमवारपासून (७ एप्रिल २०२४) सुरू होत असून, तो १२ एप्रिलपर्यंत चालणार आहे.
नव्या मंदिराच्या प्रांगणातील हा तेरावा उत्सव असून, या वर्षीच्या चैत्रोत्सवाची संपूर्ण सेवा डोंबिवलीतील मंदार हळबे आणि कुटुंबीय करणार आहेत.
चैत्र शुद्ध दशमीपासून (७ एप्रिल) पौर्णिमेपर्यंत म्हणजेच १२ एप्रिलपर्यंत धार्मिक, पारंपरिक आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा वार्षिक चैत्रोत्सव साजरा होणार आहे. दररोज पूजा, अभिषेक, लघुरुद्र, कीर्तन, गायन, नामजप आणि यागादी कार्यक्रमांचा त्यात समावेश आहे.
पहिल्या दिवशी, ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता श्रींची चतुःषष्टी राजोपचार पूजा होईल. रात्री नऊ ते साडेदहा या वेळेत डोंबिवलीच्या संजय भागवत यांचे संवादिनीवादन होणार आहे. रात्री साडेदहा वाजता स्थानिक कलाकारांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम होणार आहेत. मंगळवार, ८ एप्रिल ते शनिवार, १२ एप्रिलपर्यंत दररोज सकाळी ८ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत पूजा, अभिषेक, आरती, मंत्रपुष्प आणि महाप्रसाद होईल. याच वेळेत ८ एप्रिलला गणेशयाग, ९ एप्रिलला विष्णुयाग, १० एप्रिलला दत्तयाग, ११ एप्रिलला नवचंडी, तर १२ एप्रिलला सौरयाग होणार आहे.
८ एप्रिल ते ११ एप्रिल या कालावधीत दररोज रात्री ९ ते १२ या वेळेत नृसिंहवाडी येथील हभप शरदबुवा घाग यांची कीर्तने होणार असून, १३ एप्रिलला पहाटे ४ वाजता त्यांचेच लळिताचे कीर्तन होईल. दररोज सायंकाळी साडेसातनंतर आरत्या आणि नामजप, रात्री १२ वाजल्यानंतर भोवत्या आणि छबिन्याचा कार्यक्रम होईल. ८ एप्रिलला सायंकाळी साडेसात ते आठ या वेळेत मंत्रजागर केला जाणार आहे. ११ एप्रिलला सायंकाळी पाच ते सात या वेळेत महालक्ष्मी कुंकुमार्चन आणि हळदी-कुंकवाचा कार्यक्रम होणार आहे. १२ एप्रिल रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. १२ एप्रिललाच रात्री साडेनऊ ते १२ या वेळेत देविका टिकेकर आणि तन्मय टिकेकर यांचा भजनसंध्या हा कार्यक्रम होणार आहे.
उत्सवकाळात याग करण्यासंदर्भात अभय देवस्थळी (9421188139) आणि दीपक भाट्ये (9423875453) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच, श्रींची पूजा, अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम आणि अधिक माहितीसाठी श्रेयस मुळ्ये (9405917567, 9028745038) किंवा उमेश आंबर्डेकर (9423292437) यांच्याशी संपर्क साधावा. वार्षिक चैत्रोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानाचे अध्यक्ष मंदार हळबे, उपाध्यक्ष श्रीनिवास गुण्ये, चिटणीस नंदकुमार नेवाळकर आणि खजिनदार श्रेयस मुळ्ये यांनी केले आहे.
लांजा: मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाचा १०९वा चैत्रोत्सव ७ एप्रिलपासून
