दुरूस्तीचे काम लांबणीवर, कामगार, विद्यार्थ्यांची होतेय गैरसोय
चिपळूण प्रतिनिधी-अतिवृष्टी व महापुरात खचलेल्या एन्रॉन पुलाच्या दुरुस्तीचे काम लांबणीवर पडले आहे. परिणामी हा मार्ग अजूनही वाहतुकीस बंद ठेवल्याने कामगार वर्गासह विद्यार्थ्यांचीही ऐन परीक्षेच्या कालावधीत मोठी गैरसोय होत आहे. दुरुस्तीचे काम महिनाभर चालणार होते. मात्र दोन महिन्यानंतर हे दुरुस्तीचे काम सुरूच ठेवले आहे. प्रत्यक्षात दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले दिसत असून तेथील यंत्रणा देखिल अन्य ठिकाणी हलविण्यात आली आहे. परंतु अजूनही हा मार्ग रस्त्यात भराव टाकून वाहतुकीस बंद ठेवल्याने वाहतुकदारांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
एन्रॉन पुलाचा एक पिलर २०२१ च्या महापुरात खचल्याने तो धोकादायक बनला होता. परिणामी या पुलावरून वाहतूक दोन वर्षे बंद करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या दुरूस्तीसाठी वर्षभरापूर्वी प्रयत्न केले. यावेळी आमदार शेखर निकम यांनीही या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाची निविदा प्रक्रिया तातडीने राबवून ‘देवरे अँड सन्स’ या कंपनीवर जबाबदारी सोपवली. पहिल्या टप्प्यात खचलेल्या ठिकाणचा स्लॅब उखडून आतील स्टील मोकळे केले. जो पिलर खचला होता त्या पिलरच्या बाजूने हायड्रोलिक जॅक लावून खचलेला स्लॅब दोन्ही बाजूने वर उचलण्यात आला. त्यामुळे आता खचेलला एन्रॉन पुल समपातळीत आला आहे.
पुढच्या टप्प्यात पुलावर डांबरीकरणाचे काम करून हलकी वाहने सोडण्यात आली होती. मात्र अवजड वाहनांना या पुलावरून बंदी ठेवली होती. पुलावरील वाहतूक रोखण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूने लोखंडी कमानी उभारून अटकाव केला होता. मात्र पावसाळा सुरू होताच दुरूस्तीचे काम थांबवून यंत्रणा देखिल हलविण्यात आली होती. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक देखिल तात्पुरत्या स्वरूपात सुरू केली होती. मात्र पुन्हा दुरुस्तीच्या कामाला सुरतात केल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. त्यासाठी रस्त्याच्या मधोमध मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आला आहे. प्रत्यक्षात दुरुस्तीचे हे काम केवळ महिनाभर चालणार होते. मात्र आता दोन महिने होत आले तरी हे काम सुरूच आहे. त्यामुळे अवजड वाहनांसह अन्य वाहनांचीही ये जा बंद राहणार आहे.
विद्यार्थ्यांची होणार गैरसोय
येत्या दोन दिवसांपासून शालेय वार्षिक परीक्षा सुरु होत असल्याने या मार्गावरून पेढे हायस्कूल, ख्रिस्त ज्योती हायस्कूलचे विद्यार्थी नियमित ये जा करतात. मात्र हा रस्ता वाहतुकीस बंद केल्याने एन परीक्षा कालावधीत या विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. तसेच लोटे येथील कामगार वर्गाचीही गैरसोय होणार असल्याने हा मार्ग तातडीने खुला करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
एन्रॉन पूल अजूनही वाहतुकीसाठी बंदच !
