तरुणाचा जागीच मृत्यू; संतप्त जमावाने ट्रक पेटविला
रत्नागिरी:निवळी-जयगड मार्गावरील चाफे येथे मंगळवारी साडे अकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या अपघातात खंडाळा येथील तरुण किरण पागदे, खंडाळा, वाटद या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिल्याची माहिती समोर येत असून, रस्त्यावरील अवजड वाहतुकीविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
प्राप्त माहितीनुसार, हा अपघात चाफे गावाजवळील निवळी-जयगड मार्गावर घडला. ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर मोटारसायकलस्वाराला तब्बल चारशे फुट फरफटत नेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या भीषण धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुण हा खंडाळा येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु ट्रकच्या बेदरकार चालकामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
संतप्त जमावाचा उद्रेक
अपघाताची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीस्वाराचा मृतदेह रस्त्यावर पडलेला पाहून संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ट्रक जळत असताना धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळांनी परिस्थिती आणखीनच गंभीर बनवली. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु ग्रामस्थांचा रोष कायम असल्याचे दिसून आले.
पोलिसांचा तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, जळालेल्या ट्रकमुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, परंतु पोलिसांनी परिस्थिती हाताळून वाहतूक सुरळीत केली.
परिसरात शोककळा
या अपघातामुळे चाफे आणि खंडाळा परिसरात शोककळा पसरली आहे. मृत तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्याच्या अकाली निधनाने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिकांनी प्रशासनाकडे रस्त्याच्या दुरुस्तीसह अवजड वाहतुकीवर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे.