खेड:-कोकण मार्गावर उन्हाळी सुट्टी हंगामात नियमित रेल्वेगाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने मडगाव-एलटीटी उन्हाळी स्पेशल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २० एलएचबी डब्यांची स्पेशल ६ एप्रिलपासून कोकण मार्गावर धावणार आहे. २ एप्रिलपासून स्पेशलचे आरक्षण खुले होणार आहे.
उन्हाळी सुट्टीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने आतापर्यंत ३ उन्हाळी स्पेशलच्या फेऱ्या जाहीर केल्या आहेत. उन्हाळी सुट्टी हंगामात रेल्वेगाड्यांची गर्दी कमी करून वसई विरार, बोरिवली, भाईंदर, नालासोपारा उपनगरात वास्तव्यास असणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी उधना-मंगळूर साप्ताहिक स्पेशलही २९ जूनपर्यंत धावणार आहे. मडगाव-एलटीटी स्पेशलही जाहीर करण्यात आल्याने चाकरमान्यांना दिलासा मिळाला.
मडगाव-एलटीटी साप्ताहिक स्पेशल ६ एप्रिल ते ५ मे दरम्यान दर रविवारी धावेल. मडगाव येथून सायंकाळी ४.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता एलटीटीला पोहचेल. परतीच्या प्रवासात ७ एप्रिल ते ५ मे या कालावधीत स्पेशल दर सोमवारी धावेल. एलटीटीहून सकाळी ८.२० वाजता सुटून त्याचदिवशी रात्री ९.४० वाजता मडगाव येथे पोहचेल. स्पेशलला करमाळी, थिविम, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, मडगाव, रोहा, पेण, पनवेल, ठाणे स्थानकात थांबे देण्यात आले आहेत. या स्पेशलमुळे गर्दीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार असल्याने पर्यटकांसह चाकरमानी सुखावले आहेत.
सुट्टीच्या हंगामासाठी ६ एप्रिलपासून उन्हाळी स्पेशल रेल्वे
