दापोली: दापोली तालुक्यातील निसर्गरम्य आंजर्ले गावातील शिवदर्शन उर्फ दर्शन साठे यांची महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाच्या सचिव पदावर नियुक्ती झाली आहे.
या नियुक्तीमुळे दापोली तालुक्याला पुन्हा एकदा मानाचे आणि प्रतिष्ठेचे पद मिळाले आहे. श्री. साठे यांनी १९९९ मध्ये कक्ष अधिकारी म्हणून विधिमंडळ सचिवालयात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.
त्यानंतर त्यांनी आपल्या बुद्धिमत्ता, मेहनत आणि कार्यकुशलतेच्या जोरावर अवर सचिव, उपसचिव, सहसचिव अशा विविध पदांवर यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली आणि आता सचिव पदापर्यंत मजल मारली आहे.
त्यांच्या या ऐतिहासिक यशाने आंजर्ले गाव आणि संपूर्ण दापोली तालुक्यासाठी अभिमानास्पद क्षण निर्माण झाला आहे. साठे यांनी आपल्या २५ वर्षांच्या सेवेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आपली क्षमता सिद्ध केली आहे.
त्यांच्या या यशस्वी प्रवासामुळे स्थानिकांना प्रेरणा मिळाली असून, त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आंजर्ले परिसरातील नागरिकांनी समाजमाध्यमांद्वारे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यांच्या या कामगिरीने तालुक्याच्या नावलौकिकात भर पडली असून, आंजर्ले गावाला विशेष ओळख मिळाली आहे.
शिवदर्शन साठे यांचे हे यश केवळ त्यांच्या कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण तालुक्याचे गौरवाचे प्रतीक ठरले आहे. या नियुक्तीमुळे महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयात दापोली तालुक्याचा झेंडा पुन्हा एकदा उंचावला आहे.