देवरुख :- महाराष्ट्र राज्यातील विविध कला महाविद्यालयातून नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, वरळी मुंबईच्या वतीने विविध कला महाविद्यालयात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करून विद्यार्थ्यांची निसर्गाच्या सानिध्यात चित्र रेखाटण्यासाठी निवड केली जाते. यावर्षी नेहरू सेंटरच्यावतीने दोन निसर्गसंपन्न परिसरामध्ये प्रत्यक्ष निसर्गचित्र साकारण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील ठिकाणांकरता १० आणि गोव्यातील ठिकाणांकरता ८ विद्यार्थी कलाकारांची निवड करण्यात आली होती. यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी गावचा सुपुत्र सागर प्रदीप जाधव याचा समावेश होता. कनकाडी बौद्धवाडीतील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप सखाराम जाधव यांचा सागर हा सुपुत्र आहे.
सागर जाधव सध्या वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या कॉलेज ऑफ इंजीनियरिंग आणि व्हीज्युअल आर्ट, सायन-मुंबई येथे बॅचलर इन फाईन आर्ट मधील द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. त्याला त्याच्या दर्जेदार निसर्गचित्रांसाठी सलग दोन वर्ष त्याच्या कला महाविद्यालयाकडून ‘पॅनल ऑफ इन्स्पिरेशन’चा बहुमान प्राप्त झाला आहे. तसेच गतवर्षी “२६व्या विद्यार्थी विशेष-२०२४ कला प्रदर्शना”त त्याच्या ५ निसर्ग चित्रांची निवड झाली होती. कला महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी सागर याने देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातून कला शाखेतून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करताना, मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक संघाचे प्रतिनिधित्व करून अभिनय आणि चित्रकला प्रकारांमध्ये राष्ट्रीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात चमकदार कामगिरी केली होती. त्यावेळी त्याला महाविद्यालयात कलाशिक्षक सुरज मोहिते, विलास रहाटे आणि प्रा. धनंजय दळवी यांचे मार्गदर्शन लाभले.
नेहरू सेंटरने आयोजित केलेल्या या प्रशिक्षणात सागर याने देवरुख, मार्लेश्वर, कसबा, माखजन आणि रत्नागिरी परिसरात विविध ठिकाणी प्रत्यक्ष निसर्गचित्रे साकारली होती, यापैकी सागर याच्या ८ चित्रांचा समावेश चित्रप्रदर्शनात करण्यात आला आहे. ही सर्व चित्र सागर याने हॅन्डमेड पेपरवरती जलरंगात साकारली आहेत. सागर याला ही निसर्गचित्रे रेखाटण्यासाठी श्री. अद्वैत व किशोर नडावडेकर आणि श्री. संतोष पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये महाराष्ट्रातील विविध कला महाविद्यालयातील १८ विद्यार्थ्यांचे चित्र प्रदर्शन २५ ते ३१ मार्च, २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. सागर जाधव याच्या यशाचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, यांच्यासह सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
सागर जाधव याच्या निसर्गचित्रांचा नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमधील चित्र प्रदर्शनात सहभाग
