लांजा : गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या ८३ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह कुरचुंब चव्हाण कोंड येथे नदीपात्रात दाभोळे सुकमवाडीच्या बाजूला आढळून आला. शुक्रवारी २८ मार्च रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांजा तालुक्यातील मनोरमा सखाराम पालांडे (वय ८३, रा.कुरचुंब जाधववाडी, ता.लांजा) ही वृध्द महिला २७ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घरात कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेली होती. त्यानंतर लांजा पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर या वृद्ध महिलेचा नातेवाईक आणि पोलिसांकडून शोध घेतला जात होता, परंतु ती सापडली नव्हती. अशातच शुक्रवार २८ मार्च रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास विनय काशिनाथ पालांडे (वय ६१, रा.कुरचुंब जाधववाडी, ता.लांजा) हे आपले सासरवाडीत असताना त्यांच्या वाडीतील विकास वासुदेव जाधव याने कुरचुंब चव्हाण कोंड येथे नदीपात्रात दाभोळे सुकमवाडीचे बाजूला एका स्त्री जातीचे प्रेत पूर्णपणे कुजलेल्या आणि सडलेल्या अवस्थेत असल्याचे सांगितले. यावेळी विनय पालांडे यांनी तिथे जाऊन खात्री केली असता तीच्या गळ्यातील माळा, कानातील कुंडी व हातातील बांगड्या तसेच अंगावरील कपड्यावरून सदरचे प्रेत श्रीमती मनोरमा सखाराम पालांडे यांचे असल्याचे ओळखले.
याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार भालचंद्र रेवणे हे करत आहेत.
लांजा : तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या ८३ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला
