राजापूर:- माजी वसुंधरा अभियानात चांगली कामगिरी बजावल्यानंतर आता खरवते ग्रामपंचायतीने संपूर्ण प्लास्टिकमुक्ती वर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी केले.
राजापूर तालुक्यातील खरवते ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियानात भाग घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायतीच्या अद्ययावत संकेतस्थळाचे उद्घाटन आणि कोकण मीडियाच्या खरवते विशेषांकाचे प्रकाशन सामंत यांच्या हस्ते खरवते येथील गांगेश्वर विद्यालयात झाले. त्यावेळी ते बोलत होते. खरवते ग्रामपंचायतीने माजी वसुंधरा अभियानात राबविलेल्या विविध ८५ उपक्रमांचे सामंत यांनी कौतुक केले. खरवते गावात आढळलेल्या भुयाराचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांना पाठविले जाईल, असे सांगून सामंत म्हणाले, माझी वसुंधरा अभियानातील गुणांकनाकरिता जो कालावधी शिल्लक राहिला आहे, त्यामध्ये अभियानाकरिता आवश्यक असलेल्या सर्व त्रुटी पूर्ण करण्यासाठी संपूर्ण सहकार्य ग्रामपंचायतीला केले जाईल. ग्रामपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी तसेच तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी त्यामध्ये लक्ष द्यावे, अशी सूचना सामंत यांनी केली. अभियानामध्ये करवते ग्रामपंचायतीने जे उपक्रम राबविले आहेत ते पूर्णपणे वेगळे आहेत. त्यामुळे जिल्हा आणि विभाग पातळीवरच नव्हे, तर राज्य पातळीवरही प्रथम येण्याचे उद्दिष्ट ग्रामपंचायतीने ठेवावे, अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली.
राजापूरचे गटविकास अधिकारी नीलेश जगताप यांनी खरवते गावातील लोकांच्या एकीमुळे अभियानाचा महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे, असे कौतुकोद्गार काढले. ग्रामसेवक, सरपंच आणि सदस्यांबरोबरच ग्रामस्थांनी स्वतःहून पुढाकार घेऊन अशा अभियानात भाग घेतला तर निश्चितपणे यश मिळते, असेही ते म्हणाले.
खरवते ग्रामपंचायतीच्या संकेतस्थळाची निर्मिती करणारे हर्षद तुळपुळे यांनी संकेतस्थळा विषयीची माहिती दिली. वेगवेगळ्या बारा विभागांमध्ये गावाची माहिती देण्यात आली आहे. यापुढेही ती सातत्याने अद्ययावत करता येऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.
ग्रामसेवक नेहा कुडाळी प्रास्ताविकात म्हणाल्या, अभियानातील सर्व ग्रामस्थांच्या सहभागामुळे अभियानाचा महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. अभियानात गावाने राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा कुडाळी यांनी घेतला. आ. सामंत, सरपंच अभय चौगुले आणि उपसरपंच गौरव सोरप यांच्या हस्ते मान्यवरांचा तसेच विविध क्षेत्रांमध्ये यश मिळविणारे नागरिक तसेच विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.