दापोली:- मुंबई-गोवा महामार्गावरील निगडेनजीक गुरुवारी दुपारी १.३० च्या सुमारास दापोली तालुक्यातील मुरुड येथून कवठेमहांकाळ येथे जाणारी महिंद्रा कंपनीची लोगन कार जळून भस्मसात झाली.
चालकाच्या प्रसंगावधानाने त्याच्यासह अन्य दोघेजण बालंबाल बचावले. अपघाताची माहिती मिळताच चिपळूण महामार्ग वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून मदतकार्य केले.
चालक शुभम बापूसाहेब साबळे (२९, रा. कवठेमहांकाळ, सांगली) हे आपल्या ताब्यातील लोगन कारमधून (एम.एच. १० ए.जी. २०६६) आकाश जगन्नाथ शिंदे, रेश्मा प्रकाश शिंदे (दोघेही रा. मुरूड-दापोली) यांना घेवून मुरुड येथून कवठेमहांकाळ येथे जात. होते. भोस्ते घाट चढून कार निगडेनजीक आली असता कारच्या इंजिनमधून धूर आला. ही बाब चालकाच्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने कार रस्त्यालगत थांबवत दोघांनाही बाहेर पडण्यास सांगितले. कारमधील साहित्यही बाहेर काढले. काही क्षणातच आगीचा भडका उडून कार जळून भस्मसात झाली.
चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला असला तरी कारचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच चिपळूण महामार्ग वाहतूक पोलीस उपनिरीक्षक अनंत पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील ताठरे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार राठोड, पोलीस हवालदार सुधाकर रहाटे घटनास्थळी पोहचले.
कारला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी एमआयडीसीतील अग्निशमन बंबही घटनास्थळी पाचारण करण्यात आला. मात्र, आगीने रौद्र रुप धारण केल्याने काही क्षणातच कार भस्मसात झाली.