दापोली : दापोली तालुक्यातील मुरुड येथील जंगलात एका ३६ वर्षीय पोकलेन चालकाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकिस आली आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरुडचे माजी सरपंच सुरेश शंकर तुपे यांनी मुरुड गावातील सडा येथे तलाव खणण्याचे काम घेतले होते. त्यासाठी त्यांनी भाड्याने एक पोकलेन घेतलेला होता. त्यावर राजू नामदेव पवार वय ३६, रा. कुन्नूर, विजापूर (कर्नाटक) हा चालक म्हणून काम करत होता. १२ मार्च रोजी सकाळी ९.३० चे सुमारास या पोकलेनचा प्रेशर पाईप फुटल्याने तो आणण्यासाठी राजू पवार गेला होता तो परत आलाच नव्हता. २७ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजणेचे सुमारास तलावाचे खोदकाम सुरु असलेल्या ठिकाणासमोरील जंगलातून उग्र वास येत होता. त्यामुळे पोलीस पाटील व अन्य ग्रामस्थांनी तेथे जावून पहिले असता त्यांना झाडाच्या फांदीला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक व्यक्ती आढळून आली. त्या व्यक्तीने परिधान केलेल्या कपड्यावरून व तेथे पडलेल्या पोकलेनच्या किल्लीवरून तो मृतदेह राजू पवार याचाच असल्याची माहिती तुपे यांनी दिली. या घटनेसंदर्भात दापोली पोलीस ठाण्यात सुरेश तुपे यांनी खबर दिली असून पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.