रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे मार्गावरील बसणी येथे दोन ते तीन दिवसांपूर्वी रिकाम्या विहिरीत पडलेल्या कुत्र्याला प्राणीमित्र आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्या संध्या कोसुंबकर यांनी जीवदान दिले.
ट्रेकिंगच्या साहित्याचा उपयोग करून काल रात्री विहिरीत उतरून कोसुंबकर यांनी त्या कुत्र्याला बाहेर काढले. त्यांच्या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, हा अनुभव त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
बसणी गावात एका ठिकाणी जमिनीला समांतर विहीर खणून ठेवलेली आहे; परंतु त्या विहिरीला पाणी लागलेले नाही. खोदकाम आणि घर बांधायचे काम अर्धवट अशी तेथील स्थिती आहे. तेथील विहिरीमध्ये एक कुत्रा पडलेला होता. ही माहिती ग्रामस्थांनी दूरध्वनीवरून कोसुंबकर यांना दिली. शिवसेना तालुकाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप, गीता शिंदे, श्रद्धा तेंडुलकर, हर्शिता यांच्यासह त्यांनी मिळेल ते साहित्य घेऊन घटनास्थळ गाठले. विहिरीची खोली पाहून त्यांनी कुत्र्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
याबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या, विहीर खोल असल्यामुळे दोर टाकून काहीच उपयोग झाला नाही. बांबूच्या साह्याने कुत्र्याच्या गळ्यात किंवा कमरेत दोर अडकवण्याचा प्रयत्न दोन तास सुरू होता. त्यालाही यश आले नाही. अखेर ट्रेकिंगवाल्यांची मदत घ्यायचा निर्णय झाला. राजेश नेने यांच्याशी संपर्क केला. कोणतेही आढेवेढे न घेता घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी विहिरीत उतरले. कुत्र्याला थोडं गोंजारून धीर दिला. तो प्रचंड घाबरलेला होता. दोरीने पिशवी बांधून त्याला वर काढले. विहिरीला कठडा नसल्यामुळे पिशवी ओढून वर घ्यावी लागली. यासाठी त्यांना गावातील झगडे, शिवलकर, सुमित राणे, तेथील गवंडी कामगार यांनी सहकार्य केले.