रत्नागिरी:- उन्हाळी हंगामात मुंबई, पुण्यासह परजिल्ह्यातील चाकरमानी कोकणासह गोव्याकडे जाण्यासाठी गर्दी करतात.
त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कोकण रेल्वेमार्गावर ३ विशेष गाड्यांच्या फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३ एप्रिल ते ५ जून या कालावधीत गाड्या धावणार आहेत.
कोकण रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-सीएसएमटी-करमळी विशेष (साप्ताहिक) ही गाडी १० एप्रिल ते ५ जूनदरम्यान दर गुरूवारी मुंबई सीएसएमटीहून रात्री १२ वा.२० मिनिटांनी सुटेल. ती त्याच दिवशी दुपारी दीड वाजता गोव्यात करमळीला पोहोचेल. करमाळी-मुंबई सीएसएमटी विशेष (साप्ताहिक) १० एप्रिल ते ५ जूनदरम्यान करमळीहून दर गुरूवारी दुपारी २ वा. १५ मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वा. मुंबई सीएसएमटीला पोहोचेल. या गाडीला २२ डबे आहेत. त्यात टू टायर एसी – १, थ्री टायर एसी – ५, स्लीपर – १०, जनरल – ४, एसएलआर – २ असे डबे असतील.
दुसरी विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस-करमळी ही आठवड्यात दर गुरूवारी सोडण्यात येईल. तिचा प्रवास १० एप्रिल ते ५ जून या कालावधीत सुरू राहील. ही गाडी लो. टिळक टर्मिनसहून रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२ वाजता ती गोव्यात करमळीला पोहोचेल. तिचा परतीचा प्रवास दर शुक्रवारी करमळीहून दुपारी अडीच वाजता सुरू होईल. ती दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ५ मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. या गाडीला एकूण १९ एलएचबी डबे आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरूवनंतपुरम ही तिसरी साप्ताहिक विशेष गाडी ३ एप्रिल ते २९ मे दरम्यान दर गुरूवारी लो. टिळक टर्मिनसहून सायंकाळी ४ वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी रात्री १० वा. ४५ मिनिटांनी तिरूवनंतपुरम उत्तरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही विशेष गाडी तिरूवनंतपुरम उत्तर-लो. टिळक टर्मिनस येथून ५ ते ३१ मे या कालावधीत दर शनिवारी तिरूवनंतपुरम उत्तरहून सायंकाळी ४ वा. २० मिनिटांनी सुटून तिसऱ्या दिवशी रात्री १२ वाजून २५ मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.