गैरप्रकारमुक्त परीक्षेची संस्कृती रुजविणारे कोकण विभागीय मंडळ
रत्नागिरी : दहावीच्या बोर्ड परीक्षेत कोकण विभागीय मंडळात एकही प्रकार गेल्या पाच परीक्षेत आढळलेला नाही. यावर्षीही तीच परंपरा अबाधित असून विभागीय मंडळात दहावी परीक्षेत कॉपीचा रकाना निरंकच आहे.
राज्यातील नऊ विभागीय मंडळापैकी रत्नागिरीच्या या मंडळाने कॉपीमुक्त परीक्षा ही संस्कृती सर्वांच्या सहकार्याने रुजवली आहे. बारावी परीक्षेत रत्नागिरीत एक कॉपी प्रकाराची नोंद झाली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या अंतर्गत कोकण विभागीय मंडळ रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी सन २०१२ पासून कार्यरत आहे. सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात कॉपीमुक्त अभियान यशस्वीपणे राबविण्यात आल्यामुळेच त्याचा सकारात्मक परिणाम झाला.
कोकण विभागीय मंडळाने स्थापनेपासून कायमच कॉपीमुक्त परीक्षा घेणारे मंडळ म्हणून नावलौकीक प्राप्त केले आहे. राज्यातील इतर विभागीय मंडळाशी तुलना करता कॉपीमुक्त परीक्षा घेण्यात कोकण मंडळ आघाडीवर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही गैरमार्ग प्रकरण नाही. रत्नागिरीत बारावी परीक्षेत निव्वळ एकमेव गैरमार्ग प्रकार भरारी पथकाच्या निर्दशनास आला.
दोन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता समित्यांनी उत्तम भूमिका बजावली आहे. महसूल, पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची शिक्षण विभागास मोलाची साथ मिळाली. कोकण विभागात कॉपीमुक्त परीक्षा ही संस्कृती रुजली असल्याचे कोल्हापूर व कोकण विभागिय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.