मुंबई:- कोकणात काल (२८ मार्च) अपघातांची मालिकाच पाहायला मिळाली. कारण काल कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी तीन अपघात झाले आहेत. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून, 35 जण जखमी झाले आहेत.
अलिबाग बायपास जवळील चर्चजवळ भीषण अपघात झाला आहे. मोटारसायकल आणि स्कुटीच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. स्कुटी चालक गंभीर जखमी झाला आहे.
अलिबाग बायपास जवळील चर्चजवळ भीषण अपघात
मिथिल सुतार असे अलिबाग बायपास जवळील चर्चजवळ झालेल्या अपघातात मृत पावलेल्या मोटरसायकलस्वाराचे नाव आहे. तो अलिबागवरुन रेवसच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला आहे. या अपघाताचा सीसीटिव्ही व्हिडिओ समोर आला आहे.
सिंधुदुर्गमधील इन्सुली घाटीत एसटी बसचा अपघात, 35 प्रवासी जखमी
सिंधुदुर्गातील कुडाळ येथून पणजी येथे जाणाऱ्या एसटी बसला इन्सुली घाटीत अपघात झाला आहे. गाडीचे अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाने प्रसंगावधान राखून गाडी डोंगराच्या दिशेने उंच भागात वळवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात गाडीतील 35 प्रवासी जखमी झाले असून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात काही महिलांसह लहान मुलांचाही समावेश आहे. अनेक प्रवाशांच्या हाताला डोक्याला पायाला अशी दुखापत झाली आहे. एसटी चालकाच्या छातीला तर वाहकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
मुंबई गोवा महामार्गावर कारची दुचाकीला जोरदार धडक
मुंबई गोवा महामार्गावरील पीरलोटे भागातील हॉटेल विरंगुळा येथे भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक दिली आहे. गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कार ने दुचाकीला धडक देत रस्त्याचा दुभाजक ओलांडून मुंबईकडे जाणाऱ्या बोलेरो पीक अप गाडीवर आदळली. अपघातामध्ये दुचाकीस्वार थोडक्यात बचावाला आहे. तिन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई गोवा महामार्गावरील लोटे दरम्यान वाहतूक संथ गतीने सुरु होती.