प्राथमिक शाळा : सकाळी ७ ते ११.१५; माध्यमिक शाळा : सकाळी ७ ते ११.४५
मुंबई – राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी राज्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यात याव्यात, असा आदेश राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिला आहे.
दरम्यान, राज्यात काही ठराविक शाळा दोन सत्रात भरतात. ‘विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये’, यासाठी या शाळांनाही त्यांच्या वेळापत्रकात आवश्यक ते बदल करण्याची सूचना दिली आहे, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्यात उन्हाचा कडाका वाढल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी विविध संघटनांकडून शाळेची वेळ सकाळची करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन येत आहेत. काही जिल्ह्यांनी शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचे आदेश दिले आहेत.
सर्व जिल्ह्यांमध्ये शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येते. राज्यातील सर्व शाळांच्या वेळापत्रकात एक वाक्यता असणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनांच्या शाळांच्या वेळा शिक्षण विभागाने ठरवून दिल्या आहेत.
अनेक जिल्ह्यांमध्ये वाढत्या उन्हामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील शाळांचे असे असेल वेळापत्रक
प्राथमिक शाळा : सकाळी ७ ते ११.१५
माध्यमिक शाळा : सकाळी ७ ते ११.४५
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अशा उपाययोजना कराव्यात
मैदानी, शारीरिक हालचाली टाळाव्यात, मैदानात वर्ग घेऊ नयेत.
विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षित करावे.
वर्गात पंखे सुस्थितीत असावेत, थंड पाणी उपलब्ध करून द्यावे.
उन्हात बाहेर पडणे टाळावे.
हंगामी फळे आणि भाज्या खाणे.
सुती आणि हलक्या रंगाचे कपडे घालावे.
डोके झाकून ठेवण्यासाठी छत्री, टोपी, टॉवेलचा वापर करावा.