मुंबई –‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’अंतर्गत आजपासून (29 मार्च) राज्यातील 93.26 लाख शेतकऱ्यांना सहावा हप्ता मिळणार आहे. याअंतर्गत 2169 कोटी रुपये थेट त्यांच्या आधार आणि डीबीटी संलग्न बँक खात्यात जमा होणार आहेत.मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 पासून ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ (पीएम किसान) योजना सुरू केली. यात पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये तीन हप्त्यांत (प्रत्येकी 2000 रुपये) दिले जातात. या योजनेत राज्य सरकारने 2023-24 पासून ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना जोडली. यात केंद्राच्या 6000 रुपयांवर राज्य सरकार आणखी 6000 रुपये देते, म्हणजेच शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 12,000 रुपये मिळतात.
26 ऑक्टोबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीतून या योजनेचा पहिला हप्ता दिला होता. आतापर्यंत 5 हप्त्यांत 90.86 लाख शेतकरी कुटुंबांना 8961.31 कोटी रुपये मिळाले आहेत. डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या काळात पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता 92.89 लाख शेतकऱ्यांना मिळाला, ज्याची रक्कम 1967.12 कोटी रुपये होती. आता नमो योजनेच्या सहाव्या हप्त्यात 93.26 लाख शेतकऱ्यांना 2169 कोटी रुपये मिळतील, अशी महिती देण्यात आली आहे.