सागरी पोलीस ठाणे नाटे येथे पार पडली शांतता समितीची बैठक
राजन लाड/जैतापूर:-कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण न होता आगामी सण उत्सव शांततेत पार पडावेत ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असे आवाहन पोलीस निरीक्षक ए.बी. खेडकर यांनी केले आहे.
आगामी सण उत्सव आणि ईद-ए-मिलाद च्या पार्श्वभूमीवर सागरी पोलीस ठाणे नाटे येथे गुरुवार 27 मार्च रोजी शांतता समितीची बैठक पार पडली या बैठकीला नाटे ,साखरीनाटे ,जैतापूर येथील प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी राजापूर आणि नाटे परिसरात घटलेल्या एक-दोन प्रसंगामुळे आणि राजापूर आणि नाटे पोलीस स्टेशनमध्ये नोंद तक्रारी आणि गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी ईद, गुढीपाडवा रामनवमी, हनुमान जयंती आदी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही गावात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल अशा कोणतीही अप्रिय घटना घडू नयेत तसेच अनपेक्षित पणे घडल्यास त्यावर नियंत्रण रहावे यासाठी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सोशल मीडियामुळे एखादी लहानशी घटना देखील चुकीच्या पद्धतीने व्हायरल झाल्यास त्याचे गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागतात. त्यामुळे सोशल मीडियाचा जबाबदारी पूर्वक वापर होणे आणि त्यावर समाजातील जबाबदार नागरिकांनी गांभीर्यपूर्वक पाहणे आवश्यक असल्याचे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले. कोणत्याही धर्मातील देव देवता किंवा महापुरुषांचा अपमान होणे या गोष्टीचे कोणीच समर्थन करणार नाही. मात्र त्यातून कोणतेही गंभीर परिणाम होणार नाही यासाठी सर्वांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी आपल्यासारख्या जबाबदार आणि प्रतिष्ठित नागरिकांनी गाव पातळीवर समन्वयातून आणि चर्चेतून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले पाहिजे.
सर्व धर्मीयांनी आपले सण उत्सव प्रतिवर्षाप्रमाणेच मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरे करावेत मात्र कोणत्याही प्रकारची धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे. तसेच कायदा सुव्यवस्था बिघडवणारी घटना निदर्शनास आल्यास सर्वांनी एकत्रितपणे त्याच्यावर नियंत्रण राखले पाहिजे असे आवाहन याप्रसंगी पोलीस निरीक्षक खेडकर यांनी केले.
पोलीस स्टेशनच्या शांतता समिती प्रमाणेच सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्रित येत एक समन्वय समिती तयार करावी आणि आपल्या कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना किंवा धार्मिक तेढ निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षाही या बैठकीदरम्यान व्यक्त करण्यात आली.
या बैठकीला मनोज आडवीरकर, रमेश लांजेकर, सादत हबीब , दिवाकर आडवीरकर, अमजद बोरकर, शफी वाडकर, मलिक गडकरी, अन्वर धालवेलकर, प्रसन्न आडवीरकर, नारायण ठाकूर, पत्रकार राजन लाड, आदिल म्हसकर , फैयाज नळेकर, संतोष चव्हाण, नदीम तमके, नौशाद धालवेलकर , मजीद सायेकर , शकील कोतवडकर, शोएब म्हसकर आदींसह नाटे,साखरीनाटे, जैतापूर, दळे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.