जाखमातेच्या शिंपणे उत्सवाला प्रशासन सज्ज
संगमेश्वर: कसबा-संगमेश्वरमध्ये आज साजऱ्या होणाऱ्या जाखमातेच्या प्रसिद्ध शिंपणे उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. शिंपणे उत्सवानिमित्त आज दिवसभर संगमेश्वर – कसब्यात लाल रंगाची उधळण होणार असून, संगमेश्वरवासीय लाल रंगात न्हाऊन निघणार आहेत. उत्सवानिमित्त बाजारपेठेत ओले काजूगर, रंग व पिचकाऱ्यांची जोरदार विक्री सुरू झाली आहे.
शिंपणे उत्सवासाठी कसबा येथील देवी जाखमाता व चंडिका मंदिर तसेच संगमेश्वर येथील निनावी व देवी जाखमाता मंदिर दिव्यांच्या माळांनी व भगव्या ध्वजांनी सुशोभीत करण्यात आले आहे. गुरूवारी संध्याकाळी मुलांना शिंपणे उत्सवाच्या दिवशी दिवसभर रंगण्यासाठी व डुंबण्यासाठी कसबा येथे असणारा पाण्याचा मोठा हौद भरण्यात आला.
संगमेश्वर-कसबा येथील शिंपणे उत्सवाला अनोखी परंपरा आहे. उत्सवात बोकड, कोंबडे या सर्वांचे एकत्रित मटण करून त्यामध्ये काजूगर घालून मटण व भाकरी असा प्रसाद देण्याची या उत्सवाची प्रथा आहे. मांसाहारी असणाऱ्या या उत्सवावेळी संगमेश्वरातील घरोघरीही ओले काजूगरयुक्त मटण व भाजणीच्या वड्यांचा फर्मास बेत असतो. दिवसभर संगमेश्वर आणि परिसरामध्ये रंगपंचमी सुरू राहणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक या उत्सवासाठी येतात. हा उत्सव शांततेत पार पडण्यासाठी संगमेश्वर पोलिस ठाण्याने जादा पोलिस कुमक मागवली आहे.
रंगांची विक्री सुरू
संगमेश्वर येथील शिंपणे उत्सवात भक्तीरसाचा केवळ लाल रंग वापरण्यास परवानगी आहे. ५०० टक्का या नावाने ओळखला जाणारा रंग बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. रंग व पिचकाऱ्यांची गेले चार दिवस जोरदार विक्री झाली आहे.