गुहागर:- येथील खातू मसाले उद्योगाचे उत्पादक मालक, संचालक शाळिग्राम खातू यांना अमेरिकेतील जागतिक मानवी हक्क आयोगाच्या विद्यापीठाने डॉक्टरेट प्रदान केली आहे.
खातू यांनी १९७८ मध्ये खातू मसाले हा ब्रँड बाजारात आणला. अतिशय मेहनत घेऊन त्यांनी मसाला उद्योग भरभराटीस आणला. पाटपन्हाळे येथे खातू मसाले उद्योग समूहाचा विस्तार त्यांनी केला आहे. संपूर्ण कोकणात चार हजारपेक्षा जास्त विक्रेते आहेत. मुंबईसारख्या शहरात आणि परदेशातदेखील खातू मसाले प्रसिद्ध झाले आहेत. शिवाय कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा व इतर जिल्ह्यांतही खातू यांच्या मसाल्यांना मोठी मागणी असते. मुंबईत डी मार्टमध्ये मसाले उपलब्ध केले आहेत. ऑनलाइन पद्धतीने मसाल्यांची मागणी करण्याची सुविधाही आहे. मसाल्याचे एकूण सतरा प्रकार आहेत. त्याचबरोबर खाद्यपदार्थात उपयोगी येणारी विविध कडधान्यांचे विकसित केलेले वेगवेगळ्या चवीचे पीठही खातू मसाले उद्योगातर्फे उपलब्ध करून दिले जाते.