रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत मध्यरात्री वरवडे किनार्यापासून 10 वाव समुद्रात अनधिकृतपणे एलईडी लाईट व जनरेटर लावून मासेमारी करणार्या नौकेला मच्छीमारीसाठी सहाय्य करणार्या एका बोटीला कस्टम विभागाच्या गस्ती पथकाने ताब्यात घेतले आहे. ही नौका साखरीनाटे येथील असून, ती ताब्यात घेऊन रत्नागिरी बंदरात आणण्यात आली आहे. या बोटीवर जवळपास दहा लाखाहून अधिकचे एलईडी लाईट व जनरेटर साहित्य ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कारवाईसाठी मत्स्य विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे.
साखरीनाटे येथील नसरीन वाडकर यांच्या नावावर ही अब्बास अली ही नौका आहे. कस्टम विभागाचे पथक 26 तारखेला रात्री समुद्रात गस्त घालीत असताना मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास वरवडे गावापासून 10 वाव समुद्रात जनरेटरवर मोठमोठे एलईडी लाईट लावून मच्छीमारांना एका नौका सहाय्य करीत असल्याचे लक्षात आले. कस्टमचे गस्तीपथक त्या ठिकाणी पोहचले असता, मच्छीमारी नौका पळून गेल्या, मात्र एलईडी लाईट दाखवणारी नौका या पथकाने ताब्यात घेतली आहे.
कस्टमचे सहाय्यक आयुक्त संदीप कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात अधीक्षक अतुल गायकवाड, निरीक्षक अरुण साहू, अक्षय नागुलवार, राम दयाल, प्रमुख हवालदार पी.टी. जाधव, हवालदार रोहीत राजन यांच्यासह गिरीश वॉरियर, सुरज खडपकर, चेतन पाटील, सुकांता मोंडल, कृष्ण बिश्वास, शक्तीवेल पी., तेलमपूर्ती वेंकटसाई, राजाधिकारी, पी. के. स्वेन यांच्या पथकाने ही कारवाई केली. ताब्यात घेण्यात आलेली नौका गुरुवारी सकाळी कस्टम विभागाने मत्स्य विभागाकडे कार्यवाहीसाठी वर्ग केली आहे.
रात्री वार्यामुळे समुद्रात लाटा उसळत असल्याने कस्मट विभागाची कारवाई थांबवण्यात आली होती.