रत्नागिरी:- मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे आणि स्त्री-भ्रूणहत्येला आळा बसावा, मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी यासाठी राज्यशासनाने ‘लेक लाडकी’ ही योजना राबवली.या योजनेतून आतापर्यंत जिल्ह्यातील २ हजार ४६ लाभार्थी मुलीच्या पालकांच्या खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे १ कोटी २ लाख ३० हजार रुपये जमा झाले आहेत.
शासनाने २०२३-२४ मध्ये ‘लेक लाडकी’ ही योजना सुरू केली. मुलीच्या जन्मापासून ते ती १८ वर्षांची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने १ लाख १ हजार रुपये मिळणार आहेत. जन्मानंतर ५ हजारांचा पहिला टप्पा दिला जातो. जिल्ह्यात आत्तापर्यंत सुमारे ३ हजार ४४७ अर्ज आले होते. यापैकी २ हजार ४६ मुलींच्या पालकांच्या खात्यावर १ कोटी २ लाख ३० हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. ही योजना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून प्रभावीपणे राबवण्यात येत असून, उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण अधिकारी एस. डी. हावळे यांनी सांगितले.
मुलीचा जन्म झाल्यानंतर पहिला टप्पा संगोपनाचा म्हणून तिच्यासाठी ५ हजार रुपये दिले जातात. त्यानंतर ती पहिलीत गेल्यानंतर ६ हजार रुपये दिले जातात. सहावीत गेल्यानंतर ७ हजार रुपये तर अकरावीमध्ये गेल्यावर ८ हजार रुपये दिले जातात. शेवटच्या टप्प्यात म्हणजेच मुलीला १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये मिळतात. १ एप्रिल २०२३ नंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास संबंधितांना योजनेचा लाभ घेता येतो.
‘लेक लाडकी’चे लाभार्थी
मंडणगड – ५
दापोली – २०९
खेड – १८३
चिपळूण – ३८१
गुहागर – १३२
संगमेश्वर – १७९
रत्नागिरी – ५३०
लांजा – १३६
राजापूर – १४८