संगमेश्वर:- तालुक्यातील कळंबस्ते मोहल्ला येथील १७वर्षीय अल्पवयीन तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या अल्पवयीन तरूणाने आपल्या राहत्या घरातील एका खोलीमधील सिलिंग पंख्याला ओढणीने गळफास घेतला. ही गोष्ट शेजारील अरबाज नेवरेकर यांना सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास दिसून आली. यानंतर अरबाज नेवरेकर यांनी ही गोष्ट त्यांच्या शेजारील नसीर उस्मान दसूरकर यांच्या कानी घातली. यावेळी नसीर दसुरकर यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता अल्पवयीने तरूण पंख्याला लटकताना आढळून आला.
कदाचित तो जीवित असावा या हेतूने त्याला ग्रामस्थांच्या मदतीने खाली उतरवण्यात आले, आणि तत्काळ स्थानिक डॉक्टर श्री. नगारजी यांना बोलावण्यात आले. डॉ. नगारजी यांनी त्याची तपासणी केली असता तो मृत झाल्याचे दिसून आले. या घटनेची खबर नसीर दसुरकर यांनी संगमेश्वर पोलिसांना दिली असता संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि उत्तरीय तपासणीसाठीअल्पवयीन तरूणाचे शव संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असुन अधिक तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पोलिस करत आहेत.