कोकणचे शिल्पकार किरण शिगवण यांचा अनोखा कलाविष्कार
संगमेश्वर :- कलाविश्वातील अवलिया कलाकार म्हणून ओळखले जाणारे चिपळूण तालुक्यातील ढोक्रवली येथील शिल्पकार किरण शिगवण यांच्या पंचधातूतील शिल्पांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरले असून, ते ३१ मार्च २०२५ पर्यंत रसिकांसाठी निःशुल्क खुले आहे. शिल्पकार शिगवण हे सध्या नालासोपारा येथे रहात असले तरी ते मूळचे कोकणचे आहेत. या प्रदर्शनाचा कलारशिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिल्पकार शिगवण यांनी केले आहे.
किरण शिगवण यांच्यावर चिपळूण सावर्डा गावात बालपणीचे संस्कार झाले. त्यांचे बालपण हालाखीच्या परिस्थितीत गेले. तरीही त्यांनी हार न मानता परिस्थितीवर मात करत शालेय शिक्षण पूर्ण केले. बालपणापासूनच त्यांना कलेविषयी ओढ निर्माण झाली. शालेय शिक्षणाबरोबरच शिल्पकलेचा छंद त्यांनी जोपासला. त्यासाठी महाविद्यालयीन शिक्षण सह्याद्री स्कूल ऑफ आर्टमध्ये शिल्पकला (स्कल्पचर अँड मॉडलिंग) जी. डी. आर्ट हा चार वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केला.
लहानपणी गणपतीच्या कारखान्याबाहेर तासन्तास उभे राहून, मूर्तीची निर्मिती प्रक्रिया पाहत असे. स्वतः शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याचा प्रयत्न करत असत . काही दिवसांतच ते गावात नावारूपास आले. नंतर मुंबईत आल्यावर खऱ्या अर्थाने त्यांच्या कलेला चालना मिळाली. मोठमोठ्या नामवंत कंपन्या, अनेक शहरातील चौकात उभे असलेले महापुरुषांचे पुतळे, राजस्थान-कोटा जिल्ह्यातील चंबळ नदीत दिमाखात उभे असलेल्या स्मारकाच्या कलेची साक्ष आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप यांचे अश्वारूढ पूर्णाकृती पुतळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी अशा महापुरुषांचे पूर्ण आकृती, अर्धाकृती पुतळे/शिल्प, अयोध्येतील श्रीराम मंदिरातील शिल्पकलेचे काम ही त्यांच्या हातून घडत आहे.
आत्मिक समाधानासाठी भारतीय संस्कृती, पोत हा विषय घेऊन अनेक पंचधातूतील शिल्पे घडवली आहेत. याच शिल्पाचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत २५ मार्च रोजी सुरू झाले असून ३१ मार्च पर्यंत ते कलारसिकांना पाहता येणार आहे.गावच्या लाल शाडू मातीपासून सुरुवात ते दगड, लाकूड, पंचधातू, मार्बलमध्ये मोठमोठे पुतळे, मंदिरावरील मूर्ती, महापुरुषांची शिल्पे घडविणारा त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. राष्ट्रीय पातळीवरही त्यांच्या कलेची दखल घेत बॉम्बे आर्ट सोसायटी, स्टेट आर्ट, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया अशा देशपातळीवरील कलेच्या क्षेत्रातील नामवंत संस्थानी त्यांच्या कलेचा अनेक पुरस्काराने गौरव केला आहे. शिल्पकार किरण शिगवण यांच्या प्रदर्शनाला प्रख्यात शिल्पकार चित्रकार , सह्याद्री कला महाविद्यालयाचे चेअरमन प्रकाश अर्जुन राजेशिर्के यांनी भेट देऊन शिगवण यांना शुभेच्छा दिल्या.
कला रसिकांसाठी जहांगीरमध्ये पंचधातूतील शिल्पांची पर्वणी
