ठेकेदाराचा बेजबाबदारपणा, सोनवी नदी लाखो रुपये खर्च करून केली होती गाळमुक्त
संगमेश्वर :- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम करत असताना संगमेश्वर येथील सोनवी नदीवर उभारण्यात येणारा पूल गेली अनेक वर्षे रखडला आहे. सद्यस्थितीत सुरक्षेचे कोणतेही उपाय न करता या पुलाचे काम अत्यंत मंद गतीने सुरू आहे. पुलाच्या पिलर्सचे काम करत असताना पाया खोदताना येणारा सर्व गाळ सध्या सोनवी नदी टाकला जात असल्याने संगमेश्वर आणि माभळे वासी यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असून हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
गेली अनेक वर्षे संगमेश्वर येथील सोनवी पुलाचे काम अत्यंत मंद गतीने सुरू आहे. या पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने नदीतून पर्यायी रस्ता न काढता संगमेश्वर बस स्थानकाबाहेर एक दिशा मार्ग करून ठेवला आहे. यामुळे बस स्थानकासमोर दररोज कमालीची वाहतूक कोंडी होऊन दोन्ही बाजूंना एक कि.मी. लांबीच्या रांगा लागत आहेत. ही वाहतूक सुरळीत करताना संगमेश्वर पोलिसांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने सोनवी पुलाजवळ तातडीने तात्पुरता नदीतून पर्यायी मार्ग काढावा अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.
सध्य स्थितीत माभळे परिसरात काम करत असताना सोनवी पुलाचे काम करणारा ठेकेदार पिलर्सचा पाया खोदत असताना त्यातून येणारा सर्व चिखल आणि माती तसेच चिखल मिश्रित पाणी बेजबाबदारपणे सोनवी नदीत टाकत आहेत. पुलाच्या दुतर्फा सुरक्षेचे कोणतेही उपाय केलेले नसताना आता सोनवी नदी देखील प्रदूषित करण्याचे काम या पुलाच्या ठेकेदाराकडून केले जात आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने,पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून नदीत टाकलेला गाळ तातडीने काढायला लावून ठेकेदारावर या बेजबाबदारपणाबद्दल त्वरित कारवाई करावी अशी मागणी संगमेश्वर आणि माभळे वासियांनी केली आहे. संगमेश्वर येथे सोनवी नदीतून पर्यायी रस्ता न काढल्यास तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून संगमेश्वर बस स्थानकासमोर होणारी वाहतूक कोंडी कायमची दूर न केल्यास नाईलाजाने बस स्थानकासमोरच आंदोलन केले जाईल, असा इशारा प्रवासी संघटनेचे परशुराम पवार यांनी दिला आहे.
सोनवी पुलाचे काम करताना चिखल मिश्रित पाणी थेट नदीत
