खेड:-तालुक्यातील कळंबणी येथील एका हॉटेलजवळील बांधकामाच्या ठिकाणी काम करताना दहशतवादी विरोधी पथकाने यापूर्वी गजाआड केलेल्या बांग्लादेशी नागरिकास आश्रय देणाऱ्या जॉनी मुल्लू मुल्ला (३२, सध्या रा. खेर्डी-चिपळूण, मूळगाव पाटेश्वरी बांग्लादेश) याच्याही पथकाने सोमवारी रात्री चिपळूण येथे मुसक्या आवळल्या. मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.
अकबर अबू शेख (सध्या रा. कळंबणी, मूळगाव पडोली-बांग्लादेश) याच्या पोलिसांनी १२ मार्च रोजी मुसक्या आवळल्या होत्या. या बांग्लादेशी नागरिकास आश्रय देणाऱ्या चिपळूण येथील व्यक्तीचा येवील पोलिसांकडून शोध शोध सुरू होता. अखेर पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जॉनी मुल्ला या दुसऱ्या संशयित बांग्लादेशी नागरिकासही जेरबंद केले. अटकेतील संशयित गेल्या १८ वर्षांपासून खेर्डी-चिपळूण येथे वास्तव्यास होता.
अटकेतील संशयित ठेकेदार पद्धतीने गेल्या १८ वर्षांपासून चिपळूण येथे काम करत होता. खेर्डी-चिपळूण येथे तो वास्तव्यास होता. अकबर शेख याला त्याने इमारत बांधकामावर काम करण्यासाठी येथे आणले होते.
हा संशयित कळंबणी येथील इमारत बांधकामावर काम करत असताना दहशतवादी विरोधी पथकाने गजाआड केल्यानंतर त्याला आश्रय देणाऱ्याच्या मागावर पोलीस होते. अटकेतील संशयिताने आणखी बांग्लादेशी नागरिकांना आणले होते का, याचा पडताळा करण्यात येत आहे. या बाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन भोयर करत आहेत.