गेल्या अनेक दिवसांपासून नमो शेतकरी सन्मान योजनेच्या (Namo Shetkari Yojana) हफ्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आज अखेर सहाव्या हफ्त्याच्या लाभासह यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय (Government GR) आज निर्गमित करण्यात आला आहे.
त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर सहाव्या हफ्त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
पीएम किसानच्या हफ्त्यासोबत (PM Kisan Scheme) नमो शेतकरी सन्मान योजनेचा हफ्ता मिळत होता. मात्र मागील हफ्त्यावेळी केवळ पीएम किसानचा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर आला. त्या दिवसांपासून नमोचा हफ्ता केव्हा येईल, असे प्रश्न शेतकरी करीत होते. अखेर आज याबाबतचा शासन निर्णय घेण्यात आला आहे.
शासन निर्णयानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत, सहावा हप्ता (माहे डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५) व यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी १६४२.१८ कोटी इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
सहावा हफ्ता लवकरच
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता तसेच, पाचवा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत, सहावा हप्ता (माहे डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५) व यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी यापुर्वीच्या हप्तासाठी वितरीत निधीपैकी शिल्लक असलेल्या ६५३.५० कोटी निधी व्यत्तिरिक्त रक्कम १६४२.१८ कोटी इतका निधी वितरीत करण्याबाबत निर्णय झाला आहे.