रत्नागिरी:- शहरानजीकच्या खेडशी येथील सहकारी संस्थेच्या सचिवानेच संस्थेच्या सभासदांना तब्बल साडेसोळा लाख रुपयांचा चुना लावला. ही घटना 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत घडली आहे.
संदिप दत्ताराम घवाळी (रा.डफळचोळ वाडी मु.पो.खेडशी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित सचिवाचे नाव आहे. त्याच्या विरोधात माधव भास्कर हिर्लेकर (64,रा.पाडावे वाडी मिरजोळे एमआयडीसी,रत्नागिरी) यांनी मंगळवार 25 मार्च रोजी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, फिर्यादी माधव हिर्लेकर हे 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत खेडशी विविध कार्यकारी सहकारी संस्था खेडशी येथे लेखा परिक्षक म्हणून काम करत होते. तेव्हा या संस्थेमध्ये सचिव म्हणून संदिप घवाळी कार्यरत होता. त्याने संस्थेकडे जमा झालेल्या रक्कमा प्रत्यक्ष संस्थेच्या बँक खात्यात जमा न करता रजिस्टरी खोट्या नोंदी करुन त्या रकमेचा अपहार केला. तसेच त्याने सार्वजनिक रकमेचा गैरव्यवहार करुन संस्थेच्या सभासदांची फसवणूक केलेली आहे. संशयिता विरोधात भारतीय दंड विधान अधिनियम 1860 चे कलम 406,408,420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.