चिपळुणात नमन महोत्सवाचा शुभारंभ
चिपळूण : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने दुसरा नमन लोककला महोत्सव रत्नागिरीनंतर यंदा चिपळूणमध्ये होत आहे. नमनला राजमान्यता मिळाली आहे, तशीच शक्ती-तुरा म्हणजे जाखडीलाही मिळायला हवी. सांस्कृतिक विभागाने या लोककलेलाही न्याय द्यावा. शक्ती-तुऱ्यामध्ये वाद असतात. तसे या लोककलेतील मंडळांनी, कलाकारांनी घालू नये. शासनाकडून जे मिळेल ते घ्या. राजश्रय घ्या, मग त्यात सुधारणा करता येतील, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित तीन दिवसांच्या नमन महोत्सवाचे उद्घाटन डॉ. विनय नातू व मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या नमन महोत्सवाच्या निमंत्रणी पत्रिकेत सांस्कृतिक मंत्री ॲड. अशिष शेलार, पालकमंत्री व भाषामंत्री ना. उदय सामंत यांच्यासह कोकणातील खासदार, आमदार अशा सर्व लोकप्रतिनिधींची नावे होती. दरम्यान, आज बुधवारी व गुरुवारी असे पुढील दोन दिवस प्रत्येक दिवशी चार नमने होणार आहेत. सायंकाळी 6.30 वाजता या कार्यक्रमाला रोज सुरुवात होईल. या वेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, माजी उपनगराध्यक्ष बापू काणे, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकार, नमन लोककला संस्था जिल्हा उपाध्यक्ष युयुस्तु आर्ते, सुधाकर माचकर आदी उपस्थित होते. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दीपप्रज्वलन व नटराज पूजन करण्यात आलं. सांस्कृतिक विभागाचे सचिव सचिन बलखंडे यांनी सर्वांचे स्वागत केले. या वेळी बोलताना प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी या नमन महोत्सवाला पहिल्या दिवशी प्रेक्षकांची उपस्थिती नसल्याने त्याकडे लक्ष वेधले. राजमान्यता मिळाली आहे, परंतु लोकमान्यताही या लोककलेला मिळायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मतदान जनजागृतीसाठी आम्ही या लोककलेचा उपयोग केला, अशी आठवणही त्यांनी सांगितली. नमन लोककला संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष युयुत्सू आर्ते यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आभार मानले. कुठल्याही चेक पोस्टवर एकही रुपया नमन मंडळांना गेल्या दोन वर्षात द्यावा लागला नाही, असे त्यांनी सांगितले. माजी उपनगराध्यक्ष बापू काणे यांनीही या वेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर शाहीद खेरटकर यांनी केले.