चिपळूण : शहरातील पॉवर हाऊस परिसरातील एका वयोवृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली. याबाबतची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मात्र ही आत्महत्या त्यांनी का केली याचे कारण समजू शकलेले नाही.
राम काशिनाथ पाटकर (६०, पॉवर हाऊस) अशी आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. याबाबतची खबर नैनेश वसंत तांबडे (३९, पॉवर हाऊस) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राम पाटकर हे पॉवर हाऊस परिसरात राहात असून त्यांच्या राहात्या घरी त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. राम पाटकर यांनी कोणत्या कारणातून ही आत्महत्या केली याचा उलगडा झालेला नाही. याबाबत चिपळूण पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, राम पाटकर हे टीव्ही दुरूस्तीचे काम करत होते. पॉवर हाऊस येथील घरामध्ये ते आपल्या पत्नी व मुलीसोबत राहात होते. तर मुलगा व सून पुणे येथे वास्तव्याला असतात. दरम्यान, राम पाटकर यांनी आत्महत्या केल्याने पाटकर कुटुंबावर घटनेची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेत पाटकर कुटुंबियांचे सांत्वन केले. पोलिसांनी घटनास्थळाच्या पंचनाम्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कामथे उपजिल्हा रूग्णालयात पाठविला होता. सायंकाळी साडेसातच्या दरम्यान, राम पाटकर यांच्या मृतदेहावर शहरातील रामतिर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.