लांजा : शासनाने त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व कार्यालयांना शंभर दिवसांचा कार्यक्रम दिलेला असून, त्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलिसांना दिलेल्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत पोलीस ठाण्याच्या स्वच्छतेसह त्यांच्या सुशोभीकरणाचे, दैनंदिन कामांमध्ये सुसूत्रता आणि ती जलदगतीने करण्याचे आदेश देण्यात आले. त्या अनुषंगाने लांजा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी लांजा पोलीस ठाण्याचा पूर्णपणे कायापालट केला आहे.
राज्यात नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये सात कलमी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी प्रत्येक सरकारी कार्यालयाने करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी लांजा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातकलमी कामांचे वाटप करून दिले होते. या कार्यक्रमांतर्गत पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ करण्यात आला असून, परिसरात गुन्ह्यातील अस्ताव्यस्त पडलेल्या गाड्या इमारतीच्या मागील बाजूला साफसफाई करून उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. पोलीस ठाण्यासमोरील पुढील भाग पूर्णतः मोकळा कळा करून तो स्वच्छ करून घेण्यात आला आहे.
नागरिकांसाठी असलेल्या प्रतीक्षागृहात नागरिकांच्या हक्काच्या अधिकारांचे फलक लावले आहेत. दर्शनी भागात निरीक्षक दालनासह पोलीस ठाण्यातील इतर महत्वाच्या कक्षांच्या पाटी लावून नामकरण केले आहे. त्यामुळे नागरिकांना ज्या ठिकाणी आपले काम आहे त्याठिकाणी सहज जाता येणार आहे.
सॅनिटरी नॅपकीनचीही सुविधा उपलब्ध
सात कलमी कार्यक्रमांतर्गत कर्मचाऱ्यांना नवीन कायद्याबाबत ज्ञान, तपासाच्या आधुनिक पद्धती, न्यायालयात गुन्हे कसे सादर करावेत, ई साक्ष अॅप प्रशिक्षण आदी देण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे सॅनिटरी नॅपकिन मशीन व डिस्पोझल मशीन ही बसविण्यात आली आहे.
पोलीस ठाण्याच्या दर्शनी भागात झाडे लावण्यात आली आहेत. तसेच इमारतीच्या मागील बाजूला नव्याने पार्किंग करण्यात आले आहे. त्यामुळे दर्शनी भागात केवळ अत्यावश्यक कामासाठी गरजेची असलेली वाहने उभी करण्यात येत आहेत.