दापोली : टेटवली-सरोदेवाडी येथे घर व गोठ्याला आग लागून सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान झाले. याशिवाय शेजारील घरमालकाने त्याच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने ठेवलेले साहित्यसुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोठ्यातील १६ जनावरांना ग्रामस्थांच्या सहाय्याने सुखरुप बाहेर काढण्यात आले. घरातील पाच व्यक्ती बाजूलाच असलेल्या जुन्या घरात वास्तव्यास असल्याने अनर्थ टळला.
टेटवली-सरोदेवाडी येथील चंद्रकांत गंगावणे यांच्या घराच्या चार खोल्या आहेत. यातील दोन खोल्यांमध्ये त्यांचे कुटुंबीय राहातात व अन्य दोन खोल्यांचा वापर गुरे बांधण्यासाठी केला जातो. मात्र सद्यस्थितीत गंगावणे कुटुंबीय काही कारणास्तव या घराशेजारीलच त्यांच्या जुन्या घरात राहायला होते. रविवारी चंद्रकांत गंगावणे हे शिमगोत्सव अर्थात पालखी कार्यक्रम सुरू असल्याने रात्री मंदिरात पाऱ्यासाठी गेले होते. याचदरम्यान रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास गोठ्यात आग लागल्याचे तेथे काम करणाऱ्या कामगाराला दिसून आले. त्याने आरडाओरडा करत गंगावणे कुटुंबियांसह ग्रामस्थांना जागे केले. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत वाड्यातील १३ म्हैशी व ३ गायींना सुखरुपरित्या बाहेर काढले. मात्र घर लाकडी व कौलारू असल्याने क्षणार्धात आगीने रौद्र रुप धारण केले.
खेड येथील अग्निशामक बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तोपर्यंत घरातील सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. चंद्रकांत गंगावणे यांच्या बाजूला असलेले श्रीकृष्ण गंगावणे यांच्या घराचे काम सुरू असल्याने त्यांच्या घरातील फ्रीजसह इतर साहित्य चंद्रकांत गंगावणे यांच्याकडे ठेवण्यात आले होते. तेदेखिल आगीत भस्मसात झाले. गुरांसाठीचा पेंढा व मोठ्या प्रमाणात खाद्यदेखिल वाड्यात ठेवण्यात आले होते. तेही जळून राख झाले. आगीचे वृत्त समाजताच पोलीस उपनिरीक्षक हेमराज निर्मल यांच्यासह पोलीस अधिकारी,कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी सुरेंद्र महाडिक, सरपंच मेहबूब टेटवलकर व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तहसिलदार अर्चना बोंबे यांनी आगीच्या माहितीसाठी संपर्क ठेवला होता. गाव अध्यक्ष मंगेश रेमजे, सचिव गंगाधर यदमळ, विवेक इदाते, तंटामुक्त समिती अध्यक्ष हनुमंत भारदे, शंकर भारदे, गणपत क्षीरसागर, वाडी अध्यक्ष धनराज यादव, पोलीस पाटील आतिष भागवत आदींनी घरातील साहित्य बाहेर काढण्यासाठी व आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. तलाठी साहिल शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या वेळी पोलीस अंमलदार स्वप्निल शिवलकर उपस्थित होते.