लांजा: लांजा पोलीस स्थानकाकडून बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे. यामध्ये किरण संजय चव्हाण, वय वर्षे २७ या २८ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान लांजा तालुक्यातील खालची कुंभारवाडी येथून बेपत्ता झाल्या आहेत. या महिलेची उंची ५ फूट ४ इंच, रंग गोरा, चेहरा उभट, नाक सरळ, केस मध्यम मोकळे सोडलेले, अंगात चॉकलेटी टॉप, पांढरा सलवार, गळ्यात सोन्याचे छोटे व मोठे मंगळसूत्र, सोन्याचा हार, कानात सोन्याची कुडी, नाकात सोन्याची नथनी, पायात चांदीचे पैजण, जोडवी, सोबत चॉकलेटी रंगाची सॅक व त्यामध्ये तिच्या वापराचे कपडे व ४४ हजार रुपये आहेत. सोबत सृष्टी नावाची सहा वर्षाची मुलगी व चार वर्षाचा स्वराज नावाचा मुलगा असून बेपता महिलेजवळ पांढऱ्या रंगाची दुचाकी अॅक्टीव्हा गाडी क्र. एमएच ०८ एआर ०८८७ आहे. मनोरमा अनंत पालांडे, वय वर्षे ८३ या २७ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास लांजा तालुक्यातील कुरचुंब जाधववाडी येथून बेपत्ता झाल्या आहेत. या महिलेची उंची ४ फूट ५ इंच, रंग निमगोरा, अंगाने सडपातळ, चेहरा उभट, गाल बसके, केस लांब व अर्धवट पिकलेले, अंगात लाल रंगाचा गाऊन, हातात काठी असून पोक काढून चालते, गळ्यात सोन्याची माळ, कानात सोन्याची कुडी, पोक आल्याने पाठीची डावी बाजू वर आलेली, डाव्या पायावर जुन्या जखमेची खूण आहे. या बेपता व्यक्ती आढळल्यास पोलीस निरीक्षक, लांजा पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.