मुंबई: अभिनेता सुशांत राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केलेली नाही, तर आ. आदित्य ठाकरे व इतरांनी सामूहिक अत्याचारानंतर तिची हत्या केली आहे, असा खळबळजनक आरोप तिचे वडील सतीश सालियन यांनी मंगळवारी केला.
मुंबई पोलिसांना दिलेल्या ७५ पानी लेखी तक्रारीत त्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे. त्यांनी सहपोलिस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम यांच्याकडे तक्रार अर्ज दिला आहे.
सतीश सालियन तक्रारीत म्हणतात, आदित्य व इतरांनी दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली. हा गंभीर गुन्हा दडपण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहकार्याने कट रचण्यात आला. या कटात काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचाही सहभाग आहे. त्यांनी खोटे रेकॉर्ड तयार केले. साक्षीदारांना धमकावले व गुन्ह्याचे पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला. गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
प्रकरण काय?
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या फ्लॅटमध्ये १४ जून २०२० रोजी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्या आधी ८ जून २०२० रोजी त्याची मॅनेजर दिशा सालियन मृतावस्थेत आढळली होती. दिशाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने तिचे वडील सतीश यांची रिट याचिका सुनावणीसाठी सूचीबद्ध केली आहे. येत्या २ एप्रिलला या खटल्याची सुनावणी होणार आहे.
आदित्य ड्रग्जच्या व्यापारात
सालियन यांचे वकील नीलेश ओझा यांनीही आदित्य आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. आदित्य ड्रग्जच्या व्यापारात सामील आहेत. तसेच उद्धव हेदेखील दिशा सालियन प्रकरणातील आरोपी आहेत, असा आरोप ॲड. ओझा यांनी केला.
आता जबाबदारी पोलिसांची
आमच्याकडून सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आम्ही केलेली तक्रार हाच एफआयआर आहे. आता पुढची जबाबदारी पोलिसांची आहे. पोलिस आरोपींवर कधी कारवाई करतात हे पाहावे लागेल, असे ॲड. ओझा यांनी सांगितले.
तक्रारीत काेणा-काेणाची आहेत नावे?
सतीश सालियन यांनी आ. आदित्य ठाकरे, अभिनेता डिनो माेरिया, अभिनेता सूरज पांचोली, तसेच त्यांचे सुरक्षारक्षक, तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह, सध्या तुरुंगात असलेला निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे, अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी केल्याची माहिती ॲड. ओझा यांनी दिली.