मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गाण्यातून केलेल्या टिप्पणी प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर मुंबई पोलिसांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मंगळवारी नोटीस बजावत चौकशीला हजर राहण्यास सांगितले.
त्याने, चौकशीला उपस्थित राहण्यासाठी एक आठवड्याची मुदत मागितल्याचे समजले आहे. दुसरीकडे, सोमवारच्या गोंधळानंतर पुन्हा नव्या गाण्यातून शिंदेंना डिवचल्याचे दिसून आले. त्यामुळे वादात भर पडली आहे. कामराला विविध नंबरवरून धमक्या येत असल्याचेही त्याने सोशल मीडियावर म्हटले आहे.
‘हम होंगे कंगाल’
कामराने उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावरील केलेल्या अप्रत्यक्ष टीकेचे विडंबनगीत वादग्रस्त ठरल्यानंतर कामराने पुन्हा एकदा नवे गाणे प्रसिद्ध केले आहे. यामध्ये ‘हम होंगे कामयाब’ या गाण्याची चाल लावण्यात आली आहे. यामध्ये, विकसित भारताचे आणखी एक राष्ट्रगीत असल्याचे म्हणत त्याने ‘हम होंगे कंगाल’ हे गाणे रचले आहे. या गाण्याच्या व्हिडीओमध्ये स्टुडिओची तोडफोड आणि दोन दिवसांतील गाेंधळाचे फुटेज ठेवले आहे. त्यामुळे त्याचा हा व्हिडीओही अल्पावधीत व्हायरल झाला आहे.
तामिळनाडू, मैं कैसे आऊँ…?
कामरा याला धमकीचे कॉल सुरू असताना त्यांतील एक ऑडिओ क्लिपही व्हायरल होत आहे. यामध्ये कामरा याला एक कार्यकर्ता धमकावत शिवीगाळ करत आहे. धमकावल्यानंतर कामराला कुठे आहे? असा प्रश्न करताच, तो तामिळनाडूमध्ये असल्याचे सांगतो. पुढे ‘तामिळनाडूला कसे यायचे?’ म्हणताच, कामरा त्याला ‘रिक्षातून!’ असे उत्तर देताना दिसत आहे.