चिपळूण: कारवाईनंतरही रस्त्यांवर अतिक्रमण केल्यास थेट गुन्हे दाखल केले जातील, असा निर्वाणीचा इशारा नगर परिषद प्रशासन शहरातील व्यावसायिकांना देत आहे. सुट्टीच्या दिवशीही मुख्याधिकारी विशाल भोसले व अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शहरात फिरून पाहणी करीत आहेत. हे काम करतानाच घरपट्टी, पाणीपट्टीची वसुलीही केली जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून शहरात बाढलेल्या अतिक्रमणावर काही दिवसांपूर्वी मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी मोठी यंत्रणा तैनात करीत सलग दोन दिवस कारवाई केली. यात सुमारे १७५ अतिक्रमणांवर जेसीबी फिरवला आहे. त्यामुळे आता मध्यवर्ती बसस्थानक, भोगाळे, चिंचनाका, कै.. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुल, भाजीमंडई, बाजारपेठ, पानगल्ली, बाजारपूल, मार्कंडी, काविळतळी, बहादूरशेखनाका असे अर्धे शहर मोकळे झाले आहे. मात्र, त्यावेळी दोनच दिवस पोलीस बंदोबस्त मिळाल्याने ही कारवाई थांबवण्यात आली. त्यानंतर सध्या रमजान व शिमगोत्सव सुरू असल्याने कारवाई पूर्णपणे थांबवण्यात आली असून हे सण संपताच धडक कारवाई करण्यात येणार आहे. यात पॉवरहाऊस, अर्बन बँक बायपास ते गुहागरनाका, गोवळकोटरोड आदी परिसरांसह भंगार व्यावसायिकांच्या अतिक्रमणाचा समावेश आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्तासाठीही अर्ज करण्यात आला आहे. मात्र, ज्या भागात कारवाई झाली आहे. त्या भागात व्यावसायिक पुन्हा येऊ नयेत यासाठी पथक नेमण्यात आले असून ते दिवसातून अनेकवेळा शहरात फिरून पाहणी करीत आहेत. तर मुख्याधिकारी भोसले सुट्टीच्या दिवशीही शहरात फिरून पुन्हा अतिक्रमण न करण्याच्या सूचना देत आहेत. रविवारी ते उपमुख्याधिकारी सतीश दंडवते, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, उद्यान विभागप्रमुख प्रसाद साडविलकर, मंदार विमाग्प्रमुख वलीद बांगडे, संतोष शिंदे, प्रवीण नाईक, सतीश गोरीवले आदींच्या पथकासह शहरात फिरले. यावेळी त्यांनी अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांना समज देण्यासह कर थकित असणाऱ्या व्यापाऱ्याऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना कर भरण्याच्या सूचना केल्या. यातून हजारो रुपयांची वसुली झाली. गटारामुळे पानगल्लीत दुर्गंधी पानगल्ली सध्या अतिक्रमणमुक्त झाली आहे. येथे असलेल्या गटारावरील कडापे पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून तोडण्यात आले आहेत. त्यामुळे या गटाराची साफसफाई करणे आता शक्य आहे तरीही गटार तुंबले आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नाराजी व्यक्त होत असून गटाराची दररोज साफसफाई करण्याची मागणी होत आहे.