रत्नागिरी:- बार कौन्सिल ऑफ इंडियाने वकिलांना सोशल मीडिया, प्रमोशनल व्हिडिओ आणि इन्फ्लुएन्सर प्रमोशनद्वारे त्यांच्या सेवांची जाहिरात करण्याविरुद्ध कडक इशारा दिला आहे.
कोणत्याही परिस्थितीत वकिली व्यवसायावरील विश्वास कमी होता कामा नये, असे प्रतिपादन रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी केले.
अनैतिक व्यावसायिक जाहिरातींना आळा घालण्यासाठी बार कौन्सिल ऑफ इंडियाने कठोर उपाययोजना लागू केल्या आहेत. या संबंधी अॅड. पाटणे म्हणाले, वकिली व्यवसायाची व्यवसायभिमुख चौकट वाढू शकते तसेच साधने आणि पद्धती बदलू शकतात; परंतु त्याचे मुळ आधार, संकल्पना आणि मूल्ये जतन केली पाहिजेत. पी. एन. विघ्नेश या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने हा मुद्दा प्रकर्षाने अधोरेखित केला होता.
कठोर उपाययोजनांमध्ये नियम ३६चे उल्लंघन करणाऱ्या जाहिराती तत्काळ काढून टाकणे, बॉलीवूड अभिनेते, सेलिब्रिटींना वकिली सेवांचा प्रचार करण्यास बंदी घालणे, बॅनर आणि डिजिटल जाहिराती यांचा समावेश आहे. दिशाभूल करणारे, उल्लंघन केल्यास नोंदणी रद्द करून शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. बीसीआयने स्पष्ट केले की, वकिली व्यवसाय हा सार्वजनिक विश्वास आणि नैतिक मानकांवर आधारित आहे आणि त्याकडे व्यावसायिक उपक्रम म्हणून पाहिले जाऊ नये. अलीकडच्या इन्स्टाग्राम रीलच्या पार्श्वभूमीवर बीसीआयने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे वकिली व्यवसायावरील विश्वास कमी होऊ नये याची काळजी घ्यावी, असे अॅड. पाटणे यांनी सांगितले.