दोन आठवड्यात तीन-चार किरकोळ अपघात
देवरुख:- नजीकच्या पाटगाव-पूर-कुडवली ते मठधामापूर या रस्त्यावरील बारीक खडीमुळे तसेच काही ठिकाणी साईडपट्टी व्यवस्थित नसल्याने अपघाताची स्थिती निर्माण होत आहे. गत दोन आठवड्यात याच मार्गावर मठधामापूर येथील सप्तलिंगी पुलाजवळील उताराच्या ठिकाणी रस्त्यावरील बारीक खाडी व साईडपट्टी व्यवस्थित नसल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांचे तीन-चार वेळा किरकोळ अपघात घडले आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी येथील ग्रामस्थांमधून होत आहे.
या रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर असून गत काही महिन्यात या रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरण करण्यात आले आहे. हा रस्ता येथील ग्रामस्थांना प्रवासासाठी सोयीचा ठरत असल्याने या ठिकाणी वाहनांची वर्दळ नेहमीच असते, मात्र रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने सध्या ही वाहतूक अधिक वाढली आहे. पाटगाव, पूर, कुडवली, धामापूर, सांगवे आदी गावातील लोकांना हा मार्ग अतिशय सोयीचा ठरतो. सध्या या मार्गावर डांबरीकरणानंतर बारीक खडी टाकण्यात आली आहे.यामुळे तीव्र उताराच्या ठिकाणी दुचाकी घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. तसेच
काही ठिकाणी साईड पट्टी व्यवस्थित नसल्याने उतार व वळणाच्या ठिकाणी चारचाकी वाहने गटारात गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील मोठा अपघात टाळण्यासाठी संबंधित यंत्रणेने यावर वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. तसेच या मार्गावर जवळपास दहा ते पंधरा ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहेत. मात्र या ठिकाणी पांढरे पट्टे न मारल्याने हे गतिरोधक वाहनचालकांच्या लक्षात येत नाहीत व धोका निर्माण होतो. याकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.