7 हजार 327 अपूर्ण कामांपैकी 2 हजार 624 पूर्ण
2 हजार 515 कामांमध्ये पंचनामे करुन बंद करण्याचे शासनाचे निर्देश
रत्नागिरी:- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 7327 अपूर्ण कामांपैकी 2624 कामे आज रोजी पूर्ण झालेली असून, उर्वरित 4703 अपूर्ण कामांमध्ये शासनाच्या निर्देशानुसार 30 टक्के पेक्षा कमी पूर्तता झालेल्या 2515 कामांमध्ये पंचनामे करुन ती बंद करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार, 2365 पंचनामे अपलोड झालेले असून, उर्वरित अपूर्ण कामांचे पंचनामे तयार करुन अपलोड करण्याची कार्यवाही सुरु आहे. असे स्पष्टीकरण आज रोजीच्या एमआयएस वरील आकडेवारीनुसार उपजिल्हाधिकारी (रोहयो) हर्षलता गेडाम यांनी दिले आहे.
त्यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात स्पष्टीकरण दिले आहे की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आज रोजी एकूण 20614 कामे अपूर्ण आहेत. त्यापैकी 2021-22 व त्यापूर्वीची अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर शासनाचा विशेष भर आहे. सन 2020-21 व त्यापूर्वीची एकूण कामे 71062 होती. त्यापैकी 63735 अपूर्ण कामे पूर्ण झालेली असून, शिल्लक कामे दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी एकूण 7327 कामे अपूर्ण होती.
त्याव्यतिरिक्त शिल्लक कामांबाबत जिओ टॅगिंग वर प्रलंबित असलेली 431 कामे पूर्ण करण्यासाठी यंत्रणांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. शिल्लक 1105 कामांची निधी मागणी करण्यात आलेली असून उर्वरित 652 अपूर्ण कामे तांत्रिक कारणास्तव प्रलंबित असून त्यावर कार्यवाही सुरु आहे.
सर्व कामे यानुसार तात्काळ मार्गी लावण्याकरिता प्रशासन कटिबध्द आहे. शासनाच्या 100 दिवसीय कृती आराखड्यानुसार आयुक्त, मगांराग्रारोहयो, नागपूर यांजकडील अ.शा.प. क्र. आयुक्तालय/तां. शा/वै.का./कावि/643/2025 दिनांक 28 फेब्रुवारी 2025 अन्वये 3410 अपूर्ण कामे 100 दिवसांच्या कृती आराखड्याच्या कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.
त्यापैकी 15 मार्च 2025 पर्यंत 815 कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. त्यानुसार 682 कामे पूर्ण झाली असून उर्वरित सर्व कामे दिनांक 10 एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित सर्व यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. अपूर्ण कामे विहीत मुदतीत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊले उचलण्यात येत आहेत.