चिपळूण : गेल्या सात वर्षांत जिल्ह्यात वन्यप्राण्यांनी ४६ जणांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. या हल्ल्यात चाैघांचा मृत्यू झाला असून, ४१ जण गंभीर, तर एकजण किरकाेळ जखमी झाला आहे.
मृतांच्या नातेवाइकांसह जखमींना आतापर्यंत १ काेटी ०९ लाख ४० हजार १६३ रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.
वर्ष २०२२-२३ मध्ये रानगव्याने केलेल्या हल्ल्यात सतीश शांताराम जाधव (रा. फुरूस), भिकाजी राघू माडवकर (रा. माचाळ, लांजा), तसेच तुकाराम बाळू बडदे (रा. तळसर, चिपळूण) यांचा मृत्यू झाला. तर अरुण रेडीज (रा. चांदेराई, रत्नागिरी) यांचा रानडुकराच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.
सह्याद्री खोऱ्यातील पातेपिलवलीतर्फ वेळंब, शेवरवाडी-नांदगाव, खानू-नवीवाडी व फुरूस (ता. दापाेली), पन्हाळकाजी व ताडील (ता. दापाेली), चिंचघर-खेड, तळसर-चिपळूण, चांदेराई व पाथरट (ता. रत्नागिरी), दोडवली-गुहागर, साखरपा संगमेश्वर या ठिकाणी वन्यप्राण्यांनी माणसांवर हल्ले केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांमध्ये अजूनही वन्यप्राण्यांविषयी दहशत कायम आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात एकाचाही मृत्यू नाही
बिबट्या, रानगवा, रानडुक्कर, अस्वल, माकड व काहीजण मगरीच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे बिबट्याच्या हल्ल्यात एकाचाही मृत्यू झालेला नाही. मात्र, रानगवा, रानडुक्कर व अस्वलाच्या हल्ल्यात ४ जणांचा मृत्यू झाला.
डेरवण येथे उपचार सुरू
तोंडली-वारेली (ता. चिपळूण) गावच्या सीमेवर शनिवारी मध्यरात्री घरात घुसून बिबट्याने आशिष महाजन यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, डेरवण रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
मानवी हस्तक्षेप झाल्याशिवाय वन्यप्राण्यांकडून हल्ला होत नाही. वन्यप्राण्यांच्या हालचाली दिसल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधणे गरजेचे आहे. तसेच वन हेल्पलाइनचा टोल फ्री क्रमांक १९२६ हा चोवीस तास कार्यरत असून, त्याची मदत घ्यावी. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी पोहोचता येते. – गिरिजा देसाई, विभागीय वनअधिकारी, चिपळूण.