रत्नागिरी:- रत्नागिरीतील प्रसिद्ध तबलावादक आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक दिवंगत मिलिंद टिकेकर यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त मधुमिलिंद प्रतिष्ठानतर्फे ‘नाट्यलावण्य’ या संगीत नाटकांतील लावण्यांच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शेरे नाक्यावरील राणी लक्ष्मीबाई सभागृहात हा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमात स्वप्नील गोरे, सौ. कश्मीरा सावंत, सौ. तृप्ती महाजन या गायकांनी १८८० ते १९८० या शंभर वर्षांच्या कालखंडातील काही संगीत नाटकांतील १२ लावण्या उत्तमरीत्या सादर केल्या. संगीत बावनखणी, लावणी भुलली अभंगाला, होनाजी बाळा, संगीत स्वरसम्राज्ञी अशा एकाहून एक सरस संगीत नाटकांतील लावण्यांचा त्यात समावेश होता.
या कार्यक्रमासाठी मधुमिलिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास हर्षे यांनी सर्व कलाकारांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी विलास हर्षे (ऑर्गन), प्रथमेश शहाणे (तबला), मंगेश चव्हाण (ढोलकी), हरेश केळकर (तालवाद्य), आणि उदय गोखले (व्हायोलिन) यांनी साथसंगत केली.
लावणी ही संकल्पना, तिची खासियत आणि एकूणच लावणी आणि संगीत नाटकांतील लावणीचा प्रवास अशा अनेक संकल्पनांमधून निबंध कानिटकर यांनी कार्यक्रमाचे नेटके निवेदन केले. कार्यक्रमाचे ध्वनिसंयोजन एस. कुमार साउंड्सचे उदयराज सावंत यांनी केले. या कार्यक्रमासाठी रत्नागिरीकर रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. मधुमिलिंद प्रतिष्ठानच्या वतीने अशाच नवनवीन संकल्पनांवर आधारित कार्यक्रम त्रैमासिक कला सभेमध्ये सादर होतील अशी घोषणा या वेळी करण्यात आली.