रत्नागिरी:- केंद्रीय औद्योगिक सुरक्षादलाकडून (सीआयएसएफ) ७ मार्चला लखपत (गुजरात) ते कन्याकुमारी येथे सुरू झालेली देशातील पहिली ‘ग्रेट इंडियन कोस्टल सायक्लोथॉन’ रॅली २२ मार्चला रत्नागिरीत येणार आहे.
‘सुरक्षित तट, समृद्ध भारत’ या थीमअंतर्गत किनारी भागात राष्ट्रीय सुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण करणे, ड्रग्ज, शस्त्रे आणि स्फोटकांसह तस्करीमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांवर प्रकाश टाकणे हे या रॅलीचे उद्दिष्ट आहे.
सीआयएसएफचे कंमाडेंट राहुल कुमार यांनी याबाबत माहिती दिली. सीआयएसएफच्या ५६व्या स्थापनादिनानिमित्त ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. ही मोहीम ७ मार्चपूर्वी किनाऱ्यावरील पश्चिम बंगालमधील बक्खली येथून सुरू झाली आहे. पश्चिम मार्ग ३,७७५ किमी, तर पूर्व मार्ग २,७७८ किमीचा असेल. ३१ मार्चला कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारकात समारोप करण्यापूर्वी सायकलस्वार मुंबई, कोकण, गोवा, हल्दिया, कोणार्क, विशाखापट्टणम, चेन्नई आणि पाँडिचेरीसारख्या प्रमुख किनारी शहरांमधून प्रवास करणार आहेत. एकूण १०० समर्पित सीआयएसएफ सायकलस्वार असून, त्यात ४ महिलांचा समावेश आहे.
२५ दिवसांत ११ राज्यांचा ६,५५३ किमीचा कठीण प्रवास करणार आहेत. रत्नागिरीत या रॅलीचे २२ मार्चला आगमन होणार आहे. सर्वंकष विद्यालय, रत्नागिरी येथे सकाळी ११ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी देशभक्तीपर लहान मुलांचे कार्यक्रम होतील. कार्यक्रमाला ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातर्फे करण्यात आले आहे. देशासाठी लढताना मृत्यू पावलेल्या सैनिकांच्या कुटुंबांचा यावेळी गौरव होणार आहे. रत्नागिरीतली पाच सैनिकांच्या कुटुंबांचा यामध्ये समावेश आहे.