दरीत कोसळताना ट्रक थोडक्यात बचावला
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात अवघड अशा खेडमधील भोस्ते घाटामध्ये लोटे एमआयडीसी येथून मुंबईच्या दिशेने रासायनिक घनकचरा घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात झाला. महामार्गाच्या कडेला असणारे संरक्षण कठडा तोडून ट्रक दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावला. मात्र, या ट्रकमधून वाहतूक होत असलेला रासायनिक घनकचरा महामार्गावर पसरल्याने परिसरात उग्र वास पसरला होता. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर या अपघातामुळे काही अंशी परिणाम झाला होता. तसेच रासायनिक घनकचरा घेऊन जाणारा हा ट्रक बंदिस्त नसल्यामुळे याची चौकशी व्हावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.
संबंधित रासायनिक घनकचरा घेऊन जाणाऱ्या या गाड्या अनेक वेळा बंदिस्त केलेल्या नसतात. उघडे असतात अशावेळी पाटील दुचाकीस्वार व वाहन चालकांना उडणारी धूळ जीवघेणी ठरते आतापर्यंत अशा प्रकारे रासायनिक घनकचरा घेऊन जाणाऱ्या अनेक वाहनांचा अपघात खेडमध्ये झालेला आहे. काही वेळा घनकचरा रस्त्यावरती पडतो आणि त्याचा उग्र वास परिसरात पसरतो मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. लोटे एमआयडीसीमधून अनेक मोठमोठ्या कंपन्या कंपनीतील रासायनिक घनकचरा तसेच सीटीपीमधून येणारा रासायनिक घनकचरा तळोजा मुंबई या ठिकाणी नेला जातो मात्र तो नेत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळ व शासनाच्या घालून दिलेल्या नियम आणि अटीं कुठेही पाळल्या जात नाहीत असा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.